सांगली : तांदूळवाडी (ता.वाळवा) येथे सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता पुलावरून एसटी बस वीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात चालकासह २८ प्रवासी जखमी झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.गंभीर जखमींमध्ये शिवाजी साहेबराव माने (वय ७५, रा.पुसेसावळी, ता.खटाव जि.सातारा), दवैस मुसा चाफेकर (२४, रा.पाटण, ता.पाटण, जि.सातारा), प्रकाश सर्जेराव शिंदे (३८, रा.रिसवडे, ता.कराड, जि.सातारा), अराकत मुनीवर (वय २८, रा.कोल्हापूर) यांचा समावेश आहे. एसटी चालक वाय.डी. मोकर, वाहक माधुरी खरात, प्रकाश हनुमंत दौडमणी (वय ४०, रा.कराड, जि.सातारा), राजश्री प्रकाश दोडमणी (वय ३७, रा.कराड), सविता रवींद्र शिंदे (वय ४६, रा.कडेगाव, जि. सांगली), मनिषा शंकर शिंदे (वय ४५, रा कराड), श्रेया शंकर शिंदे (वय १८ रा. कराड), शिवाजी महादेव दुडे (वय ८३, रा.गोवारी, जि.सातारा), सुमन यादव (वय ५९, रा.औंध, ता.खटाव, जि.सातारा), राहुल तुकाराम यादव (वय ३८, रा.औंध, ता.खटाव), प्रवीण तुकाराम यादव (वय ४०, रा.औंध गोटेवाडी), सोनाली प्रवीण यादव (वय ३२, रा.औंध गोटेवाडी), शोभा तुकाराम यादव (वय ६३, रा.औंध गोटेवाडी) हे किरकोळ जखमी आहेत. या अपघाताची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील दहीवडी येथून एसटी बस (क्र.एमएच ३४, बीटी ४२०३) जोतिबाकडे निघाली होती. सोमवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदूळवाडी येथील गुरव पुलाजवळ येताच, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे तोडून गाडी वीस फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली. यात २८ प्रवासी जखमी झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, कुरळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक सुनील माने, कासेगाव ठाण्याचे हरिश्चंद्र गावडे आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांकडून मदतकार्यअपघात घडताच जखमींना बाहेर काढण्याचे काम तांदुळवाडी येथील शेतकरी आनंदराव ईश्वरा पाटील, शंकर वळीवडे, विष्णुपंत पाटील, सुरेश शिगांवकर यांनी केले.
जखमींना तातडीची मदतमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, इस्लामपूरचे आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, स्थानकप्रमुख नंदकुमार जाधव, वाहतूक नियंत्रक मिलिंद कुंभार, दीपक यादव, चंद्रशेखर पवार, राहुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व दवाखान्यात जाऊन जखमींना प्रत्येकी एक हजार रुपये तातडीची मदत देण्यात आली.
..तर मोठा अडथळा झाला असताएसटी बस ज्या ओढ्यात पडली, त्या ठिकाणी वारणा नदीवरून आणलेल्या पाण्याच्या योजनांच्या जलवाहिन्या आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजता विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जलवाहिन्यांमधून पाण्याचा स्रोत बंद होता अन्यथा जलवाहिन्या फुटून अपघाताची तीव्रता वाढली असते. जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता.