सांगली जिल्ह्यात २.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, सर्वात कमी कोणत्या तालुक्यात..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:04 IST2025-08-04T18:04:18+5:302025-08-04T18:04:44+5:30
सोयाबीन पेरणी २५ टक्क्यांनी घटली

संग्रहित छाया
सांगली : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण दोन लाख ४६ हजार ११८.७१ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, सध्या दोन लाख २५ हजार ८१८.२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच ९१.७५ टक्के क्षेत्रावर पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. सोयाबीनला दराची हमी नसल्यामुळे २५ टक्क्यांनी पेरणीचे क्षेत्र घटले आहे.
जिल्ह्यात यंदा मे आणि जून महिन्यात सतत पावसामुळे पेरण्या विलंबाने सुरू झाल्या. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांच्या पेरण्या उरकल्या आहेत. खरिपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ४६ हजार ११८ हेक्टर इतके असून, दोन लाख २५ हजार ८१८.२५ हेक्टरवर म्हणजे ९.५५ टक्के पेरणी झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ७० टक्के पेरणी झाली होती. महिन्यात २१.७५ टक्क्यांनी पेरणी वाढली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट दिसून येत आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या फक्त ३१ हजार ८३५.५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ही पेरणी फक्त ७५.९६ टक्के भागात झाली आहे. सोयाबीन क्षेत्रातील घट प्रशासनासाठी आव्हान ठरू शकते. जत तालुक्यात सर्वाधिक १०६.२८ टक्के तर सर्वात कमी शिराळा तालुक्यात ५४.१३ टक्के पेरणी झाली आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत १०४.७७ टक्के तर पलूस, मिरज तालुक्यांत ९५ टक्केपर्यंत पेरणी झाली आहे.
उडीद, सोयाबीनला किडींचा प्रादुर्भाव
बदलते वातावरण आणि रिमझिम पावसामुळे मका, मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर काही प्रमाणात रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शिफारस केलेल्या औषधांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तालुकानिहाय पेरणी क्षेत्राची टक्केवारी
तालुका - टक्केवारी
मिरज - ९५.०३
जत - १०६.२८
खानापूर - ९०.०९
वाळवा - ६४.०९
तासगाव - ९७.४१
शिराळा - ५४.१३
आटपाडी - १०४.७७
क.महांकाळ - १०४.७७
पलूस - ९६.५०
कडेगाव - ८४.३७
पीकनिहाय पेरणी क्षेत्र
पीक - क्षेत्र हेक्टर - टक्केवारी
भात - ८४७८ - ६३.०७
खरीप ज्वारी - १७०५१ - ६५.६६
बाजरी - ४४४९८ - ८८.५२
नाचणी - ३७ - २९
मका - ४९६७८.५० - ११६.९३
इतर तृणधान्य - १५०१.५० - ६७.३३
तूर - ११७६३.३० - १२१.७२
मूग - ४७८७.५० - ९२.२५
उडीद - १९९२५.२० - १३३.१४
भुईमूग - २९६२८.३५ - ९२.९६
सूर्यफूल - ५१५ - ५२.०९
सोयाबीन - ३१८३५.५० - ७५.९६