वाटेगावच्या तुतारीचा आवाज सातासमुद्रापार
By Admin | Updated: September 15, 2014 23:13 IST2014-09-15T22:31:56+5:302014-09-15T23:13:26+5:30
कलारंग सोहळा : अमेरिकेतील कार्यक्रमात तिघे वादक होणार सहभागी

वाटेगावच्या तुतारीचा आवाज सातासमुद्रापार
वाटेगाव : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे शिकागो (अमेरिका) येथे होणाऱ्या कलारंग सोहळ्यामध्ये वाटेगाव (ता. वाळवा) येथील तुतारी (शिंग) वादक आनंदा विष्णू कुंभार, पांडुरंग शंकर गुरव व चंद्रकांत बी. साठे हे सहभागी होऊन महाराष्ट्राच्या लोककलेचे सादरीकरण करणार आहेत. सुमारे ४ लाख प्रेक्षकांसमोर तुतारी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द पार्श्वगायक शंकर महादेवन यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी शिकागो येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे कलारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी वाटेगावच्या या तुतारीवादकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पांडुरंग गुरव यांनी वडिलांकडून तुतारी वादनाची कला अवगत केली आहे, तर आनंदा कुंभार व चंद्रकांत साठे यांनी पांडुरंग गुरव यांना गुरू मानून त्यांच्याकडून ही कला शिकली आहे.
या तिन्ही कलावंतांचे मूळ गाव वाटेगाव असून, पांडुरंग गुरव व आनंदा कुंभार तुतारी वादनाचा छंद जोपासतानाच खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.
प्रतिकूल परिस्थिती या तिघांनी महाराष्ट्राची शान असणारे रणवाद्य तुतारी वाजवण्याची कला जोपासण्याचे काम केले आहे. याची दखल घेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यांची निवड केली आहे. गुरव व कुंभार यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदींसमोर आपली तुतारी वादनाची कला सादर केली आहे. तसेच मुंबई येथील विविध शासकीय कार्यक्रमांवेळी त्यांना तुतारी वादनासाठी आमंत्रित केले जाते.
दरम्यान, हे तिघेही कलावंत कोल्हापुरी फेटा बांधण्यात माहीर असून, ते शिकागो येथे याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. (वार्ताहर)