Sangli: जत येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मिळाली दोन हेक्टर जमीन, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आदेश सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:45 IST2025-10-31T15:45:03+5:302025-10-31T15:45:34+5:30
जागेचा उपयोग काय होणार?

संग्रहित छाया
सांगली : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत जत शहराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जत येथील गट नंबर २२/१ मधील दोन हेक्टर क्षेत्र जमीन प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे सुपूर्द केला.
जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी या जागेचे बाजारमूल्यानुसार होणारे मूल्यांकन १५ लाख २९ हजार रुपये तहसीलदार जत यांच्यामार्फत चलनाने शासनाला जमा करणे अनिवार्य असल्याचे आदेशात नमूद केले आहे. आदेश मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत हस्तांतरित जमिनीस कुंपण घालणे किंवा संरक्षक भिंत बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित जमिनीमधील गौण खनिजावरील सर्व अधिकार शासनाने राखून ठेवले आहेत, असे आदेशात म्हणण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना जमीन प्रदान करण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्यासह इतर उपस्थित होते.
जागेचा उपयोग काय होणार?
जत नगरपरिषदेसाठी ही जागा कचरा प्रक्रिया केंद्र, प्रक्रिया केलेल्या कचऱ्याच्या साठवणीसाठी केंद्र, घनकचऱ्याच्या वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या, ट्रॅक्टर-ट्रॉली, जेसीबी, मैला वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ, मृत प्राणी दफनभूमी, भटकी कुत्री निरुपद्रवीकरण केंद्र, तसेच बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन केंद्र म्हणून वापरली जाणार आहे.