Sangli: शिरसगावात सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले, ग्रामस्थांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:54 IST2025-01-11T17:54:03+5:302025-01-11T17:54:25+5:30
ग्रामसभेत प्रशासनाविरुद्ध संताप

Sangli: शिरसगावात सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले, ग्रामस्थांचा विरोध
कडेगाव : शिरसगाव तालुका कडेगाव येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ हा प्रकल्प सुमारे २२ एकर गायरानात उभारला जात आहे. या प्रकल्पाविरोधात एकत्र येत शिरसगाव येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे काम बंद पाडले.
शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा व्हावा म्हणून राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. शिरसगाव गावात हा प्रकल्प उभारण्याचे काम मागील महिनाभरापासून सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणची जुनी झाडे तोडण्यात आली. वन खात्याने ८०५ पैकी ४६६ झाडे तोडण्यास काही शर्तींवर परवानगी दिली होती. झाडे तोडल्यावर गावच्या हद्दीमध्ये पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावे असे, या आदेशामध्ये नमूद करण्यात आले होते. परंतु, नवीन झाड लावण्यात आलेले नाही.
शिरसगाव हद्दीत गायरान क्षेत्र २५ एकर आहे. यातील १ एकर जागा २०१३ मध्ये वीज वितरण केंद्राला देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यावर गावासाठी गायरान उरणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प नको, असा ठराव शुक्रवारी (दि. १० जानेवारी) संपन्न झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. परंतु, त्यास न जुमानता प्रकल्पाचे काम शुक्रवारी दिवसभर सुरूच होते. शासनाने आमच्यावर कितीही दडपण आणले, तरी आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिरसगाव येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्रामसभेत मागणी
सौर ऊर्जाप्रकल्पासाठी शिरसगाव येथील गायरान जमीन हस्तांतरण करण्याबाबत प्रशासनातील अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे. या सर्व घटनाक्रमाशी संबंधित दोषी अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशा मागणीचा ठराव शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.