धरणग्रस्तांचा ‘करेंगे या मरेंगे’चा नारा

By Admin | Updated: August 10, 2015 00:56 IST2015-08-10T00:56:31+5:302015-08-10T00:56:31+5:30

चांदोलीत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा : दहा हजार कोटींच्या निधीची मागणी

The slogan 'Daman or will die' | धरणग्रस्तांचा ‘करेंगे या मरेंगे’चा नारा

धरणग्रस्तांचा ‘करेंगे या मरेंगे’चा नारा

वारणावती : येत्या जानेवारी २०१६ अखेर शेतीला कालवे व पोटकालवे निर्मितीसाठी २० हजार कोटी आणि पुनर्वसनासाठी १० हजार कोटींची तरतूद केली नाही, तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. श्रमिक मुक्ती दल, धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकरी ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार सुरू करतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. चांदोली (ता. शिराळा) येथे वारणा धरणाचे प्रवेशद्वार येथे धरण व प्रकल्पग्रस्त आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मोर्चासमोर ते बोलत होते. मणदूर येथील हुतात्मा स्मारकामध्ये क्रांतिवीरांना वंदन करून मोर्चास प्रारंभ झाला. मणदूरपासून आंदोलनकर्ते चालत मोर्चाने वारणा धरणाकडे गेले. प्रवेशद्वाराजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्च्यात सुमारे एक हजारावर प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. पाटणकर म्हणाले, उजनी, कोयना, वर्धा, जायकवाडी, उरमोडी, तारळी, वारणा, दूधगंगा धरणांतून शेतीला पाटाने पाणी मिळाले पाहिजे. १०० टक्के शेती सिंचनाखाली आली पाहिजे. तसेच राज्यातील धरण व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गतिशील पावले उचलली पाहिजेत. हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा एल्गार असून श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या आराखड्याचा विचार होऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे. शेतीला नियमित पाणी दिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. हे जमले नाही, तर सरकारला राज्यातील शेतकरी, धरण व प्रकल्पग्रस्त ‘चले जाव’चा इशारा देऊन ‘करेंगे या मरेंगे’चा एल्गार आझाद मैदानावर सुरू करतील.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य दिलीप पाटील, वसंत पाटील, मारुती पाटील, लाभक्षेत्रातील शेतकरी विष्णू पाटील यांची भाषणे झाली. यावेळी पाटबंधारे विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक संग्राम शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘श्रमुद’चे डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील, आनंदा वकटे, संतोष गोटल, शिवाजी पाटील, शिवाजी जाधव, वसंत पाटील आदींनी मोर्चाचे संयोजन केले. (वार्ताहर)

घोषणाबाजी...
रफिक आत्तार, भागोजी बोडके यांनी चळवळीची गाणी गाऊन मोर्चात रंगत आणली. सकाळी ११ पासून आंदोलनकर्ते ‘सरकार चले जाव, करेंगे या मरेंगे, शेतीला पाटाचे पाणी मिळालेच पाहिजे, शंभर टक्के जमीन देऊन लाभक्षेत्रात पुनर्वसन झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, लाभक्षेत्रातील शेतीला कालवे-पोटकालवे काढून पाणी मिळाले पाहिजे’, अशा घोषणा देत होते.

Web Title: The slogan 'Daman or will die'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.