गजानन पाटील
माडग्याळ/दरीबडची (सांगली) : कारवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील एकाच कुटुंबातील सहा जणांचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना बेंगलोर -तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ (जि.तुमकूर) येथे आज, शनिवारी (दि.२१) सकाळी घडली. अपघातात चंद्राम इरगोंडा येगापगोळ (वय ४६) पत्नी गौरम्मा चंद्राम येगापगोळ (४०) मुलगा ज्ञान (१६) मुलगी दिक्षा (१२) विजयलक्ष्मी मल्लिनाथ येगापगोळ -टकळकी (३५) आर्या मल्लिनाथ येगापगोळ-टकळकी (६) यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने मरबगी गावावर शोककळा पसरली आहे.मोरबगी (ता. जत) येथील मुळ रहिवाशी असलेले व सद्या कर्नाटकातील बेंगलोर येथे स्थायिक झालेले चंद्राम येगापगोळ हे उद्योजक होते. त्यांची स्वतःची बेंगलोर येथे एचएसआरएलऔट परिसरात आएएसटी साँप्टवेअर कंपनी आहे. तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत. आई-वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या कार वाहन क्र. (के. ए. ०१ एन डी १५३६) मोरबगी गावी येत होते. कुटुंबीयांसोबत दोन महिन्यांनी ते गावी येत होते. आजही ते कुटुंबीयांसोबत आई वडिलांना व नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले. चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन महिन्यापुर्वीच दीड कोटींची नवी कार खरीदी केली होती.बेंगळुरु-तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ कार आली असताना तुमकूरहून बेंगळुरुला निघालेला कंटनेर दुसऱ्या कारला साईट देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कंटनेर डिव्हायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरुन येणाऱ्या चंद्राम इरगोंडा येगापगोळ यांच्या कारवर कोसळला. यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर काढले.