Sangli: शिवशाही घेणार निरोप; येणार शिवनेरी, शिवाई आणि हिरकणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:35 IST2025-05-19T18:33:17+5:302025-05-19T18:35:07+5:30
शिवाईसाठी सांगली, मिरज, इस्लामपुरात चार्जिंग स्टेशन

संग्रहित छाया
सांगली : सांगली, मिरज आगारांतील शिवशाही गाड्या १ जूनपासून कायमस्वरूपी विश्रांती घेणार आहेत. गेली आठ वर्षे प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंददायी अनुभव देणाऱ्या या गाड्या आता कालानुरूप भंगारात निघणार आहेत. त्यांची जागा आता शिवनेरी, हिरकणी आणि शिवाई गाड्या घेणार आहेत.
सांगली आगारात नऊ आणि मिरजेत १२ शिवशाही गाड्या आहेत. त्या पुणे मार्गावर धावतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांच्या नादुरुस्तीचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रवासांसोबतच चालक आणि वाहकांसाठीही त्या डोकेदुखी बनल्या आहेत. राज्यभरातच कमी-अधिक प्रमाणात असे चित्र आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने शिवशाही गाड्यांचे रूपांतर हिरकणीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १०० शिवशाही बसचे रूपांतर हिरकणी बसमध्ये केले जाईल. शिवशाहीमधील वातानुकूलित यंत्रणा काढून टाकण्यात येईल. या बदलांमुळे तिकीट दरातही काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.
मिरज-सांगली-पुणे तसेच कोल्हापूर-पुणे मार्गावरील शिवशाही गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाडांचे प्रमाण मोठे आहे. अपघातांची वाढती संख्या, कमी वेग, वातानुकूलन व्यवस्था काम न करणे, खडखड आवाज, रस्त्यात बंद पडणे अशा विविध समस्यांमुळे प्रवासी हैराण आहेत. आता त्याऐवजी हिरकणी, शिवाई आणि शिवनेरी गाड्या येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सांगली, मिरज, इस्लामपुरात चार्जिंग स्टेशन
शिवाई गाड्या खासगी मालकीच्या असू,न त्या विजेवर धावतात. त्यासाठी इस्लामपूर स्थानकात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. सांगलीत माधवनगर रस्त्यावर एसटीच्या जागेत आणि मिरजेत दिंडीवेस परिसरातील एसटीच्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाई गाड्यांसाठी चार्जिंगची सोय होणार आहे. या गाड्यांना पूर्ण चार्जिंग होण्यासाठी सुमारे साडेतीन तासांचा वेळ लागतो. एकदा पूर्ण चार्जिंग झाल्यावर त्या सुमारे ५०० किलोमीटर धावतात. हिरकणी गाड्या जुन्या एशियाड स्वरूपाच्या आहेत. त्याशिवाय शिवनेरी गाड्याही अत्याधुनिक तंत्रांनी युक्त व प्रवाशांसाठी आरामदायी आहेत.
शिवशाहीत एसटीचे वाहक
गेल्या जानेवारीपासून सांगली, मिरजेतील शिवशाही गाड्या विनावाहक धावत होत्या. मात्र, १५ मेपासून त्यावर वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनावाहक गाड्या धावत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवशाही नादुरुस्त झाल्यानंतर किरकोळ दुरुस्ती व सुट्या भागासाठी चालकाकडे पैसे नसायचे. शिवाय प्रवासी संख्येवरही परिणाम झाला होता.