महामार्गावर शिवशाहीची बैलगाडीला धडक : ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:48 IST2018-11-12T21:47:42+5:302018-11-12T21:48:03+5:30
पुणे-बेंगलोर महामार्गावर वळसे, ता. सातारा येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला भरधाव शिवशाही बसने पाठीमागून धडक दिली.

महामार्गावर शिवशाहीची बैलगाडीला धडक : ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू
नागठाणे : पुणे-बेंगलोर महामार्गावर वळसे, ता. सातारा येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला भरधाव शिवशाही बसने पाठीमागून धडक दिली. यात ऊसतोड मजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला. नीता भागवंत बांगर (वय ३०, रा. सावरगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, महामार्गावर पुणेकडे जाणाºया बाजूकडून नीता बांगर या शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यासाठी तोडणी केलेला ऊस बैलगाडीतून घेऊन जात होत्या. यावेळी भरधाव (पुणे-आजरा-वल्लभनगर) शिवशाही बसने (एमएच ०२ एफ ३२७८) बैलगाडीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत बैलगाडी पलटी झाल्याने गाडीवर बसलेल्या नीता बांगर रस्त्यावर पडल्या. त्यांच्या अंगावरून बसचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच बसचालक सम्राट मधुकर साळवी (रा. पागेरी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात ऊस कारखाने सुरू झाले आहेत. बहुतांश कारखान्यांना बैलगाडीतून ऊस वाहतूक सुरू आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील वळसे हद्दीत ऊस वाहतूक करणाºया बैलगाडीला शिवशाही गाडीने धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.