अमेरिकेतील टेक्सासमध्ये साजरा झाला शिवजयंती उत्सव, पालखी सोहळा ठरला लक्षवेधी
By श्रीनिवास नागे | Updated: March 28, 2023 17:24 IST2023-03-28T17:24:06+5:302023-03-28T17:24:38+5:30
अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांनी सादर केलेल्या ‘शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दिली दाद

अमेरिकेतील टेक्सासमध्ये साजरा झाला शिवजयंती उत्सव, पालखी सोहळा ठरला लक्षवेधी
पुनवत (जि. सांगली) : अमेरिकास्थित मराठी बांधवांनी टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिन येथे एकत्र येत दि. २५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. यानिमित्त पारंपरिक भारतीय वेशात मराठी बांधवांनी ढोल, लेझीम या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून भगवा ध्वज फडकवला.
अमेरिकेत मराठी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. भारतीय व मराठमोळे सण व उत्सव तेथे साजरे केले जातात. तेथील ‘माझा महाराष्ट्र’ (ऑस्टिन) या संस्थेने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले. यासाठी संस्थेने टेक्सास सरकारकडे उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली. सरकारच्या परवानगीनुसार २५ मार्च रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
कॅपिटॉल बिल्डिंगसमोर अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर भगवा ध्वज मोठ्या दिमाखात फडकला. हा समस्त मराठी लोकांसाठी अभिमानाचा, संस्मरणीय आणि भावनिक क्षण होता.
शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी भव्य मंच उभारण्यात आला होता. खास पालखी बनवण्यात आली होती. थ्री डी तंत्रज्ञानाने शिवरायांच्या प्रतिमेची छपाई केली होती. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांनी सादर केलेल्या ‘शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. माय भवानी तुझे लेकरू, वेडात मराठे वीर दौडले सात, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, या गीतांनी सर्व वातावरण शिवमय झाले.
मर्दानी खेळ आणि भगवा
पालखीसमोर भगवा ध्वज दिमाखात फडकाविण्यात आला. मिरवणुकीत पालखीमागे नऊवारीतील महिलांनी लेझीम नृत्य सादर केले. ढोल-ताशा पथकही सहभागी होते. उपस्थितांनी जयघोष करीत शिवरायांना अभिवादन केले.