शिक्षक संघाच्या आंदोलनास शिराळ्यातून पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:46+5:302021-06-27T04:18:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिक्षक बँकेविरोधात शिक्षक संघाने सुरू केलेल्या ‘साष्टांग नमस्कार, विनंती विशेष’ या अनोख्या आंदोलनास शिराळा ...

शिक्षक संघाच्या आंदोलनास शिराळ्यातून पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिक्षक बँकेविरोधात शिक्षक संघाने सुरू केलेल्या ‘साष्टांग नमस्कार, विनंती विशेष’ या अनोख्या आंदोलनास शिराळा तालुक्यातील शिक्षकांनी भरघोस पाठिंबा दिला. लॉकडाऊन, सुटीचा दिवस आणि पावसाने उघडीप दिल्याने शेतातील कामे असूनसुद्धा आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे शंभरपेक्षा अधिक नाराज सभासदांनी आपली नाराजी पत्राद्वारे व्यक्त करून ही पत्रे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा केली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही पत्रे पोस्टात दाखल केली. शिक्षक बँकेत सातत्याने होत असलेला भ्रष्टाचार, बोनस पगार, बेसुमार खर्च यामुळे सभासदांमध्ये नाराजी होती. सभासद हितासाठी सदैव जागरूक असणाऱ्या शिक्षक संघाकडून अनेकवेळा या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या ६२ लाखांच्या बोनस पगाराचा पोलखोल शिक्षक संघाने केला आहे. हे बोनस पगाराचे ६२ लाख सभासदांना लाभांश म्हणून वाटावे. जाहीर केल्याप्रमाणे कायम ठेवी परत कराव्यात, सर्वच कर्जाचा व्याजदर एकअंकी करावा, ताबडतोब दोन अंकी डिव्हिडंड द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक संघाने आंदोलन केले. कोविड कालावधीचा विचार करता पत्राच्या माध्यमातून ‘साष्टांग नमस्कार, विनंती विशेष’ हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बँकेच्या कारभारावर नाराज सभासदांनी या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला. तालुकाध्यक्ष अशोक घागरे, सरचिटणीस मोहन पवार, कार्याध्यक्ष प्रकाश तथा पी.डी. यादव, कोषाध्यक्ष अरविंद देसाई, उपाध्यक्ष सुनील झिमूर, संजय पाटील यांच्याकडे सभासदांनी आपली पत्रे दिली. शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ही पत्रे पोस्टात टाकली.