शिक्षक बँक २१ कोटींच्या मासिक ठेवी परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:15+5:302021-06-27T04:18:15+5:30

सांगली : शिक्षक बँकेच्या सभासदांच्या २१ कोटींच्या मासिक ठेवींच्या रकमा परत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला. ...

Shikshak Bank will return monthly deposits of Rs 21 crore | शिक्षक बँक २१ कोटींच्या मासिक ठेवी परत करणार

शिक्षक बँक २१ कोटींच्या मासिक ठेवी परत करणार

सांगली : शिक्षक बँकेच्या सभासदांच्या २१ कोटींच्या मासिक ठेवींच्या रकमा परत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला. शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव होते.

गुरव यांनी सांगितले की, मासिक ठेवी परत करण्याचा तसेच पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे सादर केला होता, त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. २८) सभासदांना मासिक कायम ठेवी परत केल्या जाणार आहेत. संचालक मंडळाच्या या कारकिर्दीत दुसऱ्यावेळी ठेवी परत केल्या जात आहेत. कर्जवाटप करताना ६ टक्के शेअर्स रक्कम घेतली जायची, ती कमी केली असून आता ५ टक्केच घेतली जाईल. मृत झालेल्या निष्कर्जी सभासदाच्या वारसांना आजवर तीन लाखांची मदत दिली जात असे. कर्ज असल्यास अजिबात मदत मिळत नसे. या नियमात दुरुस्ती केली आहे. त्यानुसार एखाद्या सभासदाकडे कर्ज असेल, तर त्याला मदतीपासून वंचित न ठेवता कर्जाची रक्कम वजा करुन तीन लाखांपर्यंत उर्वरित मदत दिली जाईल. बँकेकडे शिल्लक ठेवदेखील परत दिली जाणार आहे. गंभीर आजारी असणाऱ्या सभासदाला व थकबाकीदाराला कर्जामध्ये सूट देण्याचेही ठरले. नव्या पेन्शन योजनेतील सभासदांना मृत्यूनंतर पाच लाखांपर्यंत मदत देण्याचेही ठरले.

या चर्चेत महादेव माळी, तुकाराम गायकवाड, हरिभाई गावडे, किरण गायकवाड, बाळासाहेब अडके, राजाराम सावंत, अर्चना खटावकर, श्रेणिक चौगुले, यु. टी. जाधव, विनायक शिंदे, महावीर हेगडे, सुधाकर पाटील, आदींनी भाग घेतला.

चौकट

मनुष्यबळ कमी केले

अध्यक्ष गुरव यांनी सांगितले की, बँकेचा कर्मचारी आकृतीबंध १७५ होता, तो कमी करुन १५०वर आणण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे २५ कर्मचाऱ्यांच्या पगारावरील वार्षिक सुमारे एक ते दीड कोटींचा खर्च कमी होणार आहे. त्यातून सभासदांना लाभ दिला जाईल. सध्या १५०पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यामुळे निवृत्तीनंतर नव्याने भरती लगेच केली जाणार नाही.

Web Title: Shikshak Bank will return monthly deposits of Rs 21 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.