विकास शहा
शिराळा : कोल्हापूर जिल्ह्यात ''शक्तीपीठ महामार्गा''ला होत असलेला वाढता विरोध लक्षात घेता, हा महामार्ग शिराळा तालुक्यातून वळवण्यात यावा किंवा त्याचा एक ''फाटा'' शिराळ्यातून नेण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार सत्यजीत देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे महामार्गाचा उद्देश सफल होईलच, पण शिराळा तालुक्याच्या विकासाचे नवे दालन उघडले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.या महामार्गासाठी १५ किलोमीटरचा रस्ता मिळू शकतो.आमदार देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात, त्यामुळे त्यांच्या या मागणीला सरकार सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.देशमुख म्हणाले, सध्याच्या विटा-अनुस्कुरा राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. याच मार्गावर शक्तीपीठ महामार्ग विकसित केल्यास, तो पुढे गोवा-मुंबई महामार्गाला जोडला जाऊन सिंधुदुर्गपर्यंत पोहोचेल. यामुळे शासनाचा मूळ उद्देश सफल होईल.
हा महामार्ग डोंगरी भागातून जाणार असल्याने तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. जरी कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध थांबला तरी, शिराळ्यातील पर्यटनस्थळे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामार्गाचा एक फाटा तालुक्यातून न्यावा, अशीही सूचना त्यांनी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जर हा मार्ग शिराळा तालुक्यातून आला, तर तो तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराळ भागातून बोगद्यांच्या साहाय्याने थेट कोकणाला जोडणारा एक आधुनिक महामार्ग असेल. यामुळे शिराळा तालुक्याच्या दळणवळणात मोठी क्रांती होऊ शकते. ज्या-ज्या भागातून महामार्ग जातात, तिथे विकास वेगाने होतो आणि त्या परिसराचे महत्त्व वाढते. शिराळ्यासारख्या डोंगरी तालुक्यातून हा महामार्ग गेल्यास येथील आर्थिक स्तर उंचावण्यास निश्चितच मदत होईल. शिराळ्यासारख्या निसर्गसंपन्न पण डोंगराळ तालुक्याचा आर्थिक कायापालट करण्यासाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरू शकतो, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.बारा जिल्ह्यामधून जातो शक्तिपीठ महामार्गशक्तीपीठ महामार्ग एकूण १२ जिल्ह्यांतून जातो, यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग (पत्रादेवी - गोवा सीमा) आदींचा समावेश आहे.
प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांच्या आवाक्यातशक्तीपीठ महामार्ग झाल्यास शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मृतीस्थळ, श्री गोरक्षनाथ मंदिर आणि श्री अंबामाता मंदिर, चांदोली अभयारण्य आणि गुढे-पाचगणी पठार, ऐतिहासिक विशाळगड, प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थान आदी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या आवाक्यात येणार आहेत.
Web Summary : MLA Satyajit Deshmukh requests CM to divert Shaktipeeth Highway via Shirala for development and tourism. The highway will boost economy.
Web Summary : विधायक सत्यजीत देशमुख ने मुख्यमंत्री से शक्तिपीठ राजमार्ग को विकास और पर्यटन के लिए शिराला से मोड़ने का अनुरोध किया। राजमार्ग अर्थव्यवस्था को बढ़ावा देगा।