दत्ता पाटीलतासगाव : तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे मनोमिलन झाले होते. त्या काळात २५ मार्च २००८ रोजी स्थापन झालेल्या आणि तासगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी सहकारी बायो शुगर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. आबा गटाला सात, काका गटाला चार जागा, तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय संघर्षानंतर अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा दोन्ही गटांनी एकत्रित येत ही निवडणूक बिनविरोध केल्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.सन २००७ साली तासगाव तालुक्याच्या राजकारणात नवा राजकीय अध्याय सुरू झाला होता. पारंपरिक विरोधक असणारे आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांचे मनोमिलन झाले. याच मनोमिलनाच्या काळात २५ मार्च २००८ रोजी तासगाव तालुका कार्यक्षेत्र निश्चित करून, तासगाव तालुका शेतकरी सहकारी बायो शुगर कारखान्याची स्थापना झाली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या आशेने या कारखान्याचे सभासद झाले. संस्थेच्या स्थापनेनंतर आर. आर. पाटील अध्यक्ष, तर संजयकाका पाटील उपाध्यक्ष होते. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर आबा गटाचे जगन्नाथ मस्के अध्यक्ष, तर अजय पाटील उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. डी. पाटील यांनी या संस्थेच्या लेखापरीक्षणाची मागणी केली होती. तसेच संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळे नवीन संचालक मंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आबा आणि काका गटांत उभा दावा निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना, सभासद असलेल्या या संस्थेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याची उत्सुकता होती.मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या संस्थेत निवडणूक न लावता बिनविरोध केली. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या आणि केवळ कागदावर अस्तित्व असलेल्या बायोशुगर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने का होईना आबा-काका गटाची पुन्हा एकदा सेटलमेंट पाहायला मिळाली आहे. या सेटलमेंटची तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कारखान्यावर एक नजर -
- सभासद संख्या - १५७१
- व्यक्तिगत भाग भांडवल - ३६ लाख ५६ हजार
- खेळते भाग भांडवल - एक कोटी १९ लाख ५७ हजार ३२४
- सभासद वर्गणी - दोन हजार
बिनविरोध संचालक मंडळ - अजय पाटील, नवनाथ मस्के, सदाशिव जाधव, नवनाथ पवार, विलास पाटील, सुखदेव पाटील, जनार्धन खराडे, बाळासो पाटील, उल्का माने, मंगल जोतराव खंडू होवाळे, अरुण खरमाटे, विलास साळुंखे.