ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:17 AM2019-05-13T00:17:18+5:302019-05-13T00:17:26+5:30

पलूस : पलूस तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव (दादा) पांडुरंग पुदाले (वय ८५) यांचे ...

Senior leader Vasantrao Poudale passes away | ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांचे निधन

ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांचे निधन

Next

पलूस : पलूस तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव (दादा) पांडुरंग पुदाले (वय ८५) यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते पलूस नगरपालिकेचे गटनेते सुहास पुदाले यांचे वडील, तर सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांचे चुलते होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमणापूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. डॉ. पतंगराव कदम यांचेही ते निकटचे
सहकारी होते.
गेल्या काही दिवसांपासून वसंतराव पुदाले आजारी होते. शनिवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नसल्याने पहाटे साडेचार वाजता त्यांचे निधन झाले.
वसंतराव पुदाले यांचा जन्म १५ जुलै १९३४ रोजी पलूस येथे झाला. कॉँग्रेसचे अनुयायी असलेल्या वसंतराव पुदाले यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांवर काम केले होते. वसंतदादा पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. आमदार बाबासाहेब पाटील, दिनकरआबा पाटील यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, तासगाव पंचायत समितीचे सभापती, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष, पलूसचे माजी सरपंच, तासगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती, पलूस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशा विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमणापूर रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी मोठा जनसमुदाय लोटला. सकाळपासूनच पलूससह परिसरातील गावांमध्ये दुकाने बंद ठेवून पुदाले यांना आदरांजली वाहण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता शहरातून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या पलूस सहकारी बँकेसमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी १ वाजता पलूस येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, तहसीलदार राजेंद्र पोळ, महेंद्र लाड, खाशाबा दळवी, बापूसाहेब येसुगडे, उदय परांजपे, जयंतीलाल शहा, पांडुरंग सूर्यवंशी, नगराध्यक्ष राजाराम सदामते, विठ्ठल देवळे, तानाजी करांडे, मारुती चव्हाण, मानसिंग पाटील, दिगंबर पाटील, व्ही. वाय. पाटील यांच्यासह जिल्'ातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव पुदाले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी १० वाजता पलूस स्मशानभूमीत होणार आहे.

 

 

 

 

Web Title: Senior leader Vasantrao Poudale passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.