‘लालपरी’चे स्टेअरिंग महिलांच्या हाती, सांगलीत ११ जणींची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:51 IST2022-12-08T15:51:13+5:302022-12-08T15:51:42+5:30
प्रथम छोट्या अंतरावरील शहरी एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाणार

‘लालपरी’चे स्टेअरिंग महिलांच्या हाती, सांगलीत ११ जणींची नियुक्ती
सांगली : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक- वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत ११ महिलांची निवड झाली असून त्यांचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या अवजड वाहन परवान्यासाठी पुन्हा ८० दिवसाचे प्रशिक्षण झाल्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती जाणार आहे.
वर्षापूर्वी झालेल्या एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेत ११ महिलांची जुलै २०२१ मध्ये निवड केली आहे. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी काही अटींमध्ये बदलही केला होता. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव, अशी अट यापूर्वी होती. मात्र, अट शिथील करून महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवली होती.
त्यानुसार महिलांनी अर्ज केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक- वाहक पदासाठी ११ महिला पात्र ठरल्या होत्या. त्यांना अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले आहे. ११ पैकी सहा महिलांनी उत्तमपणे प्रशिक्षण पूर्ण करून सध्या अवजड वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी पुन्हा ८० दिवसाचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील.
प्रथम शहरी बसेस चालविणार
या महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावरील म्हणजेच सांगली ते मिरज शहरी एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल, असेही एसटी महामंडळाच्या सांगली विभागाचे सहायक वाहतूक अधीक्षक विक्रम हांडे यांनी सांगितले.