डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते विश्वात्मक - श्रीपाल सबनीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:05 IST2024-12-30T17:05:32+5:302024-12-30T17:05:49+5:30

सांगलीत दुसरे दीपस्तंभ साहित्य संमेलन उत्साहात

Second Dipstambh Literary Conference in Sangli in excitement | डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते विश्वात्मक - श्रीपाल सबनीस 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते विश्वात्मक - श्रीपाल सबनीस 

सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते विश्वात्मक आहेत. मानवमुक्तीचा विचार मांडणारे बाबासाहेब हे नेल्सन मंडेला, मार्क्सप्रमाणे जागतिक आहेत. बाबासाहेब हे शांततेचे व अहिंसेचे वारस आहेत. मार्क्स आणि गांधी जेवढे जगात पोहोचले तेवढे ते जगात पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि दीपस्तंभ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात ते बोलत होते. उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक सचित तासगावकर, प्रमुख पाहुणे दीपककुमार खोब्रागडे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. जगन कराडे, सुरेश माने, शुभांगी कांबळे आणि दीपस्तंभच्या संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सबनीस म्हणाले, हिंदू धर्मात, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात ईश्वरता आहे. जगात जवळपास सहाशे कोटी लोक ईश्वर मानतात. तर दीड कोटी बुद्धिस्ट ईश्वर मानत नाहीत. सध्या अनेकजण धर्माने बुद्धिस्ट आहेत, पण देव मानतात. ग्रामीण भागात काहींच्या अंगात बुद्ध येतो, ही कलंकित करणारी गोष्ट आहे. विज्ञानात ईश्वर सिद्ध होत नाही. हे कळून सुद्धा काही वैज्ञानिक ईश्वर मानतात. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला. दलित मुक्तीचा, मानवमुक्तीचा विचार त्यांनी मांडला. जे लोक ईश्वर मानतात, त्यांचाही त्यांनी विचार केला. बाबासाहेबांना संपूर्ण बुद्धिझम संविधानात आणता आला नाही, परंतु अहिंसेचे तत्त्व संविधानात आणले. घटना कोणत्याही तत्त्वाचा टिळा लावत नाही, ती धर्मनिरपेक्ष आहे. सरकार आणि शासनालाही सर्वधर्मसमभाव आहे.

आज जगात रशिया, अमेरिका आणि चीन या महासत्ता क्रूर खेळ खेळत आहेत. त्यामध्ये जग भरडले जात आहे. अणुस्फोट झाला तर जग बेचिराख होईल. जगात शांततेची गरज आहे. भारत खऱ्या अर्थाने महासत्ता आहे. कारण भारतात बुद्ध, महावीर, गांधी, बसवेश्वर आहेत. हे महापुरुष जगात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सामर्थ्याची बेरीज करून सकलजनहिताय भूमिका घ्यावी लागेल. आरपीआय ही सर्वपक्षीय असावी अशी बाबासाहेबांची इच्छा होती. तिचे तुकडे झाले. परंतु बाबासाहेबांच्या चळवळीचे तुकडे होणे हे देशाला परवडणारे नाही. नवहिंदुत्ववाद आक्रमक झाला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी अनेक दिशांनी आणि विधायक लोकांनी एकत्र येऊन नव्या आंबेडकरवादाचा विकास व्हायला हवा.

सचित तासगावकर म्हणाले, गुलामगिरीच्या विरोधात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. गुलामी तोडण्यासाठी, नष्ट करण्यासाठी संघर्ष केला. साहित्य क्षेत्रात आंबेडकरांनी विद्रोहाचा मंत्र दिला. आंबेडकरवादी साहित्य विद्रोही असून, हजारो वर्षापासून ग्रासलेल्या विषमतेच्या विरोधात त्यांनी विद्रोह केला. प्रस्थापितांच्या साहित्याच्या विरोधात जर कोणते साहित्य असेल तर ते आंबेडकरी विद्रोही साहित्य आहे. आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. सध्याच्या युगात सर्वत्र कर्मकांड सुरू आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आंबेडकरवादी विद्रोही साहित्याचा पुरस्कार करावा.

स्वागताध्यक्ष प्रा. जगन कराडे म्हणाले, दीपस्तंभ सांस्कृतिक संघाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दीपस्तंभने येथील विहारात तरुणांना काम देण्यासाठी उपक्रम राबविले आहेत. खऱ्या अर्थाने विहार केंद्र संस्कार केंद्र बनले आहे. सध्याच्या काळात धम्माचा प्रचार व प्रसार करणे हे महत्त्वाचे कार्य दीपस्तंभने हाती घेतले आहे.

यावेळी गौतम कांबळे यांच्या ‘धांडोळा घेत आहे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ॲड. भारत शिंदे यांनी परिचय करून दिला. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य, सूर्यकांत कटकोळ, रमेश कुदळे, प्रकाश आवारे, डॉ. विजय भोसले, अमोल माने आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रा. पी. आर. कांबळे यांनी आभार मानले.

उद्योगाचे प्रशिक्षण देणारे एकमेव बुद्धविहार

बुद्धविहार केंद्रातून तरुणांना उद्योग धंद्याचे प्रशिक्षण देणारे सांगलीतील केंद्र एकमेव म्हणावे लागेल. देशात अनेक विहारांमध्ये भांडणे, कोर्ट केसेस सुरू आहेत. परंतु येथे धम्म चळवळ, सामाजिक समतेची, आर्थिक साक्षरतेची, स्वावलंबनाची चळवळ अनुभवास येते अशा शब्दात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कौतुक केले.

Web Title: Second Dipstambh Literary Conference in Sangli in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.