मतदान टक्का वाढीसाठी शालेय मुले सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:15 IST2019-04-03T16:14:51+5:302019-04-03T16:15:00+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात आता शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. महापालिका क्षेत्रातील २८ हजार

मतदान टक्का वाढीसाठी शालेय मुले सरसावली
सांगली : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात आता शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. महापालिका क्षेत्रातील २८ हजार विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचा आग्रह केला आहे.
मतदार जागृती अभियानाची जबाबदारी असलेल्या नोडल अधिकारी तथा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मोसमी बर्डे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. मोसमी बर्डे यांनी गेल्या काही दिवसांत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या शनिवारी सांगली शहरात सायकल रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली. तसेच विविध महाविद्यालयातील तरुण मतदारांनाही मतदानाचे आवाहन केले जात आहे.
यात आता शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात १८७ शाळांमधील २८ हजार २३४ विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करणे लोकशाहीचा अधिकार आहे, तो बजावून लोकशाही बळकट करावी, अशा आशयाची पत्रे लिहिली आहेत.
ती पत्रे पोस्टातून पालकांना पाठविली जात आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास बर्डे यांनी व्यक्त केला.