सांगली शहरात गणेश मंडळांचे देखावे खुले
By Admin | Updated: September 18, 2015 23:11 IST2015-09-18T22:50:32+5:302015-09-18T23:11:10+5:30
गणेशभक्तांच्या उत्साहाला आले उधाण : यंदाही सामाजिक, पौराणिक, तांत्रिक विषयांवर भर

सांगली शहरात गणेश मंडळांचे देखावे खुले
सांगली : सांगली शहरात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर शुक्रवारी बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी देखावे खुले केले. यंदा सामाजिक, पौराणिक विषयांसह तांत्रिक देखाव्यांवरही मंडळांनी भर दिला आहे. अनेक मंडळांनी भव्य व आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून या मूर्तीबरोबरच आकर्षक विद्युत रोषणाई यासह सजीव देखाव्यांची परंपराही कायम राखली आहे. सांगली शहरात गणेशोत्सवाच्या तिसऱ्या, चौथ्या दिवसापर्यंत देखाव्यांची तयारी सुरू असते. यंदा मात्र गणेश मंडळांनी महिनाभर आधीपासूनच तयारी करीत गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच देखावे खुले होतील, यासाठी प्रयत्न केले. यात काही मंडळांना यशही आले. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बहुतांश सार्वजनिक मंडळांनी सायंकाळी देखावे खुले केले आहेत. यंदा सार्वजनिक मंडळांनी सामाजिक व पौराणिक देखाव्यांवर जादा भर दिला आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेचा प्रभाव देखाव्यांवर दिसत आहे. शिलंगण चौक मंडळाने मल्हार व बानूच्या विवाहाचा देखावा उभारला आहे. कॉलेज कार्नरजवळील सावकार मंडळाने नृसिंह अवतार हा देखावा सादर केला आहे. शहीद भगतसिंह मंडळाने कालिकामाता मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे. वखारभागातील लक्ष्मी-नारायण गणेशोत्सव मंडळाने ‘नवजीवन ज्ञानेश्वरी’चे हा संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील एका घटनेवर आधारित देखावा उभारला आहे. व्यापारी गणेशोत्सव मंडळाने संत तुकाराम यांची विठ्ठलभक्ती देखाव्यातून साकारली आहे. मोटारमालक संघ मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्यदिव्य देखावा केला आहे. ‘द्रौपदी वस्त्रहरण’ हा मंडळाचा देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कापडपेठ गणेशोत्सव मंडळाने नेहमीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक देखाव्यावर भर दिला आहे. यंदा या मंडळाने ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ हा इतिहासकालीन कथेवरील देखावा केला आहे. कापड पेठेतीलच ओम गणेश मंडळाने स्वामी समर्थांच्या जीवनावर देखावा केला आहे. बसस्थानक परिसरातील रणझुंजार मंडळाने संत नरहरी सोनार यांच्या कथेवर देखावा केला आहे. दीनानाथ चौक मंडळाने ‘गंगा अवतरण’ हा देखावा केला आहे.
शहरातील देखावे शुक्रवारी खुले झाल्याने नागरिकांनी सायंकाळनंतर रस्त्यावर गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने शहर उजळले आहे. लहान-मोठी गणेश मंडळे भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. त्यात आता शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्टीचे असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले असून चौका-चौकात बंदोबस्त तैनात केला आहे. (प्रतिनिधी)
आझाद मंडळाचा सुुवर्ण गणपती
शहरातील आझाद गणेश मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे मंडळाने ‘श्रीं’च्या पाच फुटी सुवर्णमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने आझाद चौक उजळला आहे. याशिवाय मंडळाने रक्तदान, नेत्रदान, स्त्री भ्रूणहत्या, स्वच्छता मोहीम, वाहतूक शिस्त, शेतकरी आत्महत्या या सामाजिक विषयांनाही हात घालत विविध देखावे केले आहेत. हे देखावे नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.