गार्डी गावचे सरपंच ते आमदार; अनिल बाबरांचा थक्क करणारा राजकीय प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 01:41 PM2024-02-01T13:41:33+5:302024-02-01T13:41:58+5:30

निवडणुकीत जनतेने त्यांना ‘एक नोट, एक व्होट’ देऊन विजयी केले

Sarpanch of Gardi village to MLA; Anil Babar astonishing political journey | गार्डी गावचे सरपंच ते आमदार; अनिल बाबरांचा थक्क करणारा राजकीय प्रवास 

गार्डी गावचे सरपंच ते आमदार; अनिल बाबरांचा थक्क करणारा राजकीय प्रवास 

दिलीप मोहिते

सांगली जिल्ह्यातील अतिदुष्काळी खानापूर तालुक्याच्या गार्डी या त्यांच्या छोट्याशा खेडेगावातून आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासास सुरुवात झाली. रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे दि. ७ जानेवारी १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाबर यांचा गार्डी गावचे सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना ग्रामस्थांनी गार्डी गावचे सरपंचपद बिनविरोध बहाल केले. तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. १९७८ ला ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर १९८१ पर्यंत त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतिपद भूषविले. १९८२ ते १९९० या कालावधीत त्यांनी खानापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीत काम करीत असताना त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते, शाळाखोल्यांचे बांधकाम, दुरुस्ती, पाझर तलाव, नालाबंडिंग यासह जलसंधारणाची कामे, तसेच शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या.

१९६७ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघात अनिल बाबर यांनी १९९० ला पहिल्यांदा कॉँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढविली. अपक्ष उमेदवार हणमंतराव पाटील यांचा २५ हजार २६७ मतांनी पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतरच्या १९९५ च्या निवडणुकीत राज्यात आलेल्या अपक्षांच्या लाटेत बाबर यांना आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याकडून सुमारे २० हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.

त्यानंतर १९९९ ला कॉँग्रेसचे राष्ट्रवादीत विभाजन झाल्यानंतर ते शरद पवार यांच्या गोटात सहभागी झाले. त्यावेळी आटपाडीच्या देशमुख गटाच्या पाठिंब्यावर बाबर यांनी कॉँग्रेसचे रामराव पाटील यांचा पराभव केला. २१ हजार ९१६ मतांची आघाडी घेत बाबर दुसऱ्यांदा आमदार झाले.
त्यानंतर सन २००४ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बाबर यांना सदाशिवराव पाटील यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले; परंतु पदावर नसतानाही सलग दहा वर्षे त्यांचा जनसंपर्क कायम हाेता. हाच जनसंपर्क २०१४ च्या निवडणुकीत त्यांना यशापर्यंत घेऊन गेला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली. ते धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले. त्यानंतर २०१९ ची निवडणूकही शिवसेनेतून लढवत ते चौथ्यांदा विधानसभेत गेले.

राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांना आघाडीतील मित्रपक्षांकडून स्थानिक पातळीवर त्रास हाेऊ लागला. त्याबद्दल त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या काळात मतदारसंघात काम करताना मित्रपक्षातील नेत्यांकडून दुजाभाव होत असल्याचीही त्यांची तक्रार होती. त्यामुळेच बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात सहभाग घेतला.

बाबर यांचा गार्डीचे सरपंच ते आमदार असा संघर्षमय राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सहकार्यातून मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे मंजूर होऊन ती पूर्णत्वासही गेली. ते मतदारसंघात टेंभू योजनेचे जनक, पाणीदार आमदार म्हणून ओळखले जात होते.

टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान जनता कधीही विसरणार नाही. त्यांनी १९९९ ते २००८ या कालावधीत बाबर यांनी नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. गेल्या २० वर्षांपासून ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक आहेत. शेतकरी कुटुंबातील व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांचा सरपंच ते आमदारकीपर्यंतचा संघर्षमय राजकीय प्रवास संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात कायम राहील.

‘एक नोट, एक व्होट’चे पहिले आमदार..

प्रचंड जनसंपर्क आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे १९९० मध्ये खानापूर-आटपाडी मतदारसंघातून कॉँग्रेसतर्फे अनिल बाबर निवडून आले. या निवडणुकीत जनतेने त्यांना ‘एक नोट, एक व्होट’ देऊन विजयी केले. बहुधा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा. त्यामुळे जनतेच्या मतांवर आणि निधीवर निवडून आलेले आमदार अशी त्यांची ख्याती त्या काळात सर्वत्र होती.

Web Title: Sarpanch of Gardi village to MLA; Anil Babar astonishing political journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.