सांगलीची चारवेळा राष्ट्रीय पदक विजेती राबतेय रोजंदारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 17:30 IST2021-06-03T17:10:58+5:302021-06-03T17:30:53+5:30

Corona Virus sangli : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीगीर संजना बागडी सध्या ऊसाच्या शेतात राबत आहे. मैदाने बंद झाल्याने आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरुन काळ्या रानात रोजंदारीवर घाम गाळावा लागत आहे. कुस्तीपंढरी असणाऱ्या सांगली, कोल्हापुरच्या मातीचे दातृत्व कोठे हरवले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Sanjana Bagdi, a four-time national medalist from Sangli, works in a sugarcane field on a daily basis | सांगलीची चारवेळा राष्ट्रीय पदक विजेती राबतेय रोजंदारीवर

सांगलीची चारवेळा राष्ट्रीय पदक विजेती राबतेय रोजंदारीवर

ठळक मुद्देचारवेळा राष्ट्रीय पदक विजेती रोजंदारीवर सांगलीची संजना बागडी राबतेय ऊसाच्या शेतात

संतोष भिसे

सांगली : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीगीर संजना बागडी सध्या ऊसाच्या शेतात राबत आहे. मैदाने बंद झाल्याने आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरुन काळ्या रानात रोजंदारीवर घाम गाळावा लागत आहे. कुस्तीपंढरी असणाऱ्या सांगली, कोल्हापुरच्या मातीचे दातृत्व कोठे हरवले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महिला कुस्ती क्षेत्रात आघाडीची युवा कु्स्तीगीर म्हणून संजनाने नाव कमवले आहे. कतृर्त्वाने सिद्धही केले आहे. दिल्ली, पुणे, पाटणा, बेल्लारी येथील राष्ट्रीय स्पर्धांत पदके पटकावली आहेत. कोरोनाविरुद्धच्या मैदानात मात्र सपशेल माघार घ्यावी लागली आहे. देशभरातील स्पर्धा रद्द झाल्या. गावोगावच्या यात्रा व मैदाने रद्द झाली, त्यामुळे आर्थिक स्त्रोत थांबला. स्पर्धेतील मानधन व बक्षिसातून आहाराचा, सरावाचा खर्च निघायचा. पण लॉकडाऊनमुळे जणू तिची कारकीर्दच लॉक झाली आहे.

सांगलीजवळच्या तुंग (ता. मिरज) येथे संजना राहते. वडील खंडू कृष्णेत मासेमारी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. बारावीत शिकणारी संजना कुस्तीच्या बक्षिसांमधून स्वत:चा खर्च चालवते, वडीलांवर भार टाकत नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मात्र पर्याय राहीला नाही. राष्ट्रीय खेळाडूचा सराव आणि आहाराचा महिन्याचा खर्च ५० ते ७० हजारांच्या घरात जातो. संजनाला मात्र मुरड घालून पाच-सात हजारांतच भागवावा लागत आहे.

कृष्णेची पातळी वाढल्याने वडीलांची मासेमारी थांबली आहे, पण संजनाचा खर्च तर थांबणारा नाही, त्यामुळे ती शेतात रोजंदारीवर राबायला जात आहे. ऊसासाठी सरी सोडणे, वाफे तयार करणे, पाण्यासाठी दारे तयार करणे अशी कामे करत आहे. सहा ते आठ तासांच्या कामासाठी ३०० रुपयांपर्यंत मजुरी मिळते, त्यातून स्वत:चा आणि काही प्रमाणात घरचाही खर्च निघतो.

मैदाने बंद असली तरी संजनाने सराव थांबविलेला नाही. सकाळी घरात दोरीवरचे व्यायाम, पोहणे आदीच्या माध्यमातून तंदुरुस्ती राखते. संध्याकाळी कवलापुरला उत्तमराव पाटील यांच्या कुस्ती केंद्रात वडील घेऊन जातात.

सांगलीकरांनो, कोठे गेले तुमचे दातृत्व?

संजनासारख्या प्रतिभावंत राष्ट्रीय कुस्तीगीराला खर्चासाठी शेतात रोजंदारीवर राबण्याची वेळ आल्याने सांगलीकरांच्या दातृत्वावर प्रश्न निर्माण झाले आहेत. कुस्तीला लोकाश्रयाचा बडेजाव मिरवणाऱ्या साखर कारखानदारांची भाषाही पोकळच असल्याचे सिद्ध होत आहे. चारवेळा राष्ट्रीय पदके मिळवल्यानंतर तिने आणखी कशी गुणवत्ता सिद्ध करायला हवी? असाही प्रश्न आहे. मैदान मारल्यावर डोक्यावर घेऊन नाचणारे सांगलीकर लॉकडाऊनमध्ये मात्र ती आमच्या गावची नाहीच या कोत्या भूमिकेत वावरत आहेत.


मैदाने बंद असल्याने सराव आणि उत्पन्न दोन्ही थांबले आहे. खर्च चालवण्यासाठी शेतात घाम गाळण्याशिवाय पर्याय नव्हता. कामाच्या निमित्ताने शारिरीक मेहनतही होते.
- संजना बागडी,
युवा महिला कुस्तीगीर

Web Title: Sanjana Bagdi, a four-time national medalist from Sangli, works in a sugarcane field on a daily basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.