दत्ता पाटीलतासगाव : विधानसभा निवडणुकीत दोन गावांचा अपवाद वगळता सर्व गावातून उच्चांकी मताधिक्य घेत आमदार झालेल्या रोहित पाटील यांच्या ‘सिकंदर’ पणाला धुरंधर राजकीय खेळीने माजी खासदार संजय पाटील यांनी धोबीपछाड दिला. त्यामुळे आमदार गटाच्या पंचायत समितीतील एकहाती सत्तेला सुरुंग लागला. जिल्हा परिषदेवर आमदार गटाचे वर्चस्व राहिले असले तरी पंचायत समिती हातातून गेल्यामुळे आमदार रोहित पाटील यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांना धक्क्यावर धक्के बसले. या धक्क्यातून सावरण्याची संधी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली. काठावर मिळालेल्या विजयाने माजी खासदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला. याच विजयातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला बेरजेचे राजकारण साधण्याची किमया माजी खासदार संजय पाटील यांनी सुरू केली. वास्तविक, निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात संजयकाका गट बॅकफूटवरच होता. आमदार रोहित पाटील यांच्याकडे तगड्या कार्यकर्त्यांची फळी जिल्हा परिषदेसाठी रिंगणात होती. दुसरीकडे चिंचणीचा हक्काचा बालेकिल्ला संजयकाकांनी आमदार गटाला सोडला, तर येळावी सारख्या ठिकाणी देखील उमेदवाराची निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे संजयकाका बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र संजयकाकांनी दोन पावले मागे येत पंचायत समितीसाठी बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली.आमदार गटातील नाराजी आणि संधीचा फायदा घेत काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि पंचायत समितीत बिणीच्या शिलेदारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. परिणामी, आमदार रोहित पाटील यांचा सावळजसारखा पंचायत समितीचा बालेकिल्ला देखील उद्ध्वस्त झाला आणि पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी खासदार गट सत्तेत आला.वास्तविक, तासगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आमदार गटाचे एकहाती वर्चस्व आहे. मात्र, उमेदवारी देताना चुकलेली निवड, आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात न घेणे, विनिंग मेरिट असलेल्या उमेदवारांना डावलून नवख्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयोग, प्रस्थापित उमेदवारांच्या नाराजीचा ‘अंडरकरंट’ न ओळखता उमेदवारी लादण्याची भूमिका-अशा एक ना अनेक चुकांमुळे एकहाती सत्ता हातात येण्याची शक्यता असताना देखील हक्काचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करून घेण्याची वेळ आमदार गटावर आली. याचा दुरगामी परिणाम येणाऱ्या राजकारणावर होणार आहे.सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या संजय काकांनी बेरजेचे गणित साधत पंचायत समितीवर सत्ता आणण्याची किमया केली असली तरी आमदार रोहित पाटील यांना मात्र या निकालाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषदेत आमदार गटाची सरशीयावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या आणि काठावर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र जिल्हा परिषदेत चार जागा मिळवलेल्या आमदार गटाला ४७.४२ टक्के इतके मतदान झाले आहे. तर खासदार गटाच्या उमेदवारांची एकूण टक्केवारी ४२.०५ टक्के आहे.
पंचायत समितीत माजी खासदार गटाचे वर्चस्वपंचायत समितीच्या बारा गणांतील माजी खासदार गटाच्या उमेदवारांना एकूण ४४.९२ टक्के इतके मतदान झाले. तर पंचायत समितीच्या सत्तेतून पायउतार झालेल्या आमदार गटाच्या उमेदवारांना ४३.८८ टक्के इतके मतदान मिळाले आहे.
पसंतीच्या उमेदवारालाच मतदारांनी दिले प्राधान्य जिल्हा परिषद गट आणि गण अशा पॅनल-टू-पॅनल मतदान झाले असते तर अनेक ठिकाणी वेगळा निकाल पाहायला मिळाला असता. मात्र मतदारांनी यावेळी नेत्यांच्या उमेदवारीवर विश्वास न ठेवता हवा असलेल्या उमेदवारालाच पसंती दिल्याचे मतदानावरून दिसून येत आहे.सहा ठिकाणी कटफुलीमतदारसंघात सहा ठिकाणी कटफुलीने मतदान झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उमेदवार एका पक्षाचा तर पंचायत समितीचा उमेदवार दुसऱ्या पक्षाचा विजयी झाला आहे. त्यामध्ये पेड, विसापूर, सावर्डे, मणेराजुरी, सावळज आणि वायफळे या पंचायत समिती गणांचा समावेश आहे. विशेषतः मणेराजुरी पंचायत समिती गणात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. १२ पंचायत समिती सदस्यांपैकी सर्वाधिक उच्चांकी मतांनी विजयी झालेल्या आमदार गटाच्या संगीता लांडगे यांना मिळालेल्या मतापेक्षा तब्बल ३,००० मते आमदार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार यांना कमी मिळाली.
Web Summary : Sanjay Patil strategically outmaneuvered Rohit Patil in the Sangli ZP election, securing control of the Panchayat Samiti. Despite Rohit Patil's ZP dominance, the Panchayat Samiti loss prompts introspection after crucial missteps.
Web Summary : सांगली जिला परिषद चुनाव में संजय पाटिल ने रोहित पाटिल को मात दी, पंचायत समिति पर कब्जा जमाया। रोहित पाटिल के जिला परिषद वर्चस्व के बावजूद, पंचायत समिति हार के बाद आत्मनिरीक्षण की आवश्यकता है।