सांगली : वसंतदादा बॅँक राष्ट्रवादीनेच बंद पाडली
By Admin | Updated: September 20, 2014 00:28 IST2014-09-20T00:02:52+5:302014-09-20T00:28:43+5:30
मदन पाटील : जयंत पाटील यांच्यावर निशाणा

सांगली : वसंतदादा बॅँक राष्ट्रवादीनेच बंद पाडली
सांगली : राष्ट्रवादीशी संबंधित लोकांनीच वसंतदादा बँकेच्या कर्जाची परतफेड केली नाही. रिझर्व्ह बँकेने कोणतीही नोटीस न देता बँकेचा परवाना रद्द करून अवसायकाची नियुक्ती केली. त्यामुळे बँक बंद पडण्यास राष्ट्रवादीच कारणीभूत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी आज, शुक्रवारी पत्रकार बैठकीत केला. बँकेवरील कारवाईसाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी कोणाला भेटत होते, त्यावेळी अर्थमंत्री कोण होते, हे साऱ्यांनाच माहीत आहे, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीत काँग्रेस व राष्ट्रवादीत वाक्युद्ध पेटले आहे. काल, गुरुवारी राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी मदन पाटील यांच्यावर टीका केली होती. वसंतदादा बँक व कारखान्याकडील १६८ कोटींची थकीत रक्कम द्यावी, अशी मागणीही केली होती. त्याला आज मदन पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, वसंतदादा बँकेने उद्योगधंदे, व्यापार वाढावा, यासाठी अनेकांना कर्जपुरवठा केला. मात्र, ज्यांनी कर्जे घेतली, त्यांनी त्यांची परतफेड केलीच नाही. ही सर्व मंडळी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. त्यांच्या कर्जवसुलीसाठी मोर्चे काढले, घरासमोर फलक लावले, तरीही त्यांनी पैसे भरले नाहीत. राष्ट्रवादीच्या मंडळींमुळेच बँक अडचणीत आली. रिझर्व्ह बँकेनेही नोटीस नसताना परवाना रद्द केला. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी कोणाला भेटत होते? त्यावेळी अर्थमंत्री कोण होते?
काँग्रेस आघाडीबाबत ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी आज मिरजेत राष्ट्रवादीचा मेळावा घेतला आहे. हे काय आहे? त्यांनी आमच्यावर बोलायचे आणि आम्ही मात्र गप्प बसायचे, असे यापुढे चालणार नाही. देशात लोकशाही आहे.वसंतदादा कारखान्याच्या जागेची विक्री करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील. त्यासाठी अध्यक्ष विशाल पाटील प्रयत्नशील आहेत. कोणाचेही पैसे ठेवणार नाही. महायुती तुटण्याच्या मार्गावर आहे. आघाडीचे काय होते, हे बघावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेत काँग्रेसच्या दोन बंडखोर नगरसेवकांना स्वाभिमानी आघाडीला पाठिंबा देण्यास सांगितले होते; म्हणूनच भाजपचे गौतम पवार नगरसेवक झाले. आम्हाला राष्ट्रवादीचा एक स्वीकृत नगरसेवक वाढवायचा नव्हता. पालिकेत भाजप अल्पमतात होती, असेही स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. ा पाटील स्वार्थी
राष्ट्रवादीचे दिनकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील स्वार्थी आहेत. सुरेश पाटील हा तर अत्यंत महत्त्वाकांक्षी माणूस असून, मला काय मिळते, याकडेच त्यांचे लक्ष असते. सत्तेसाठी हपापलेले हे लोक आता लोकांची दिशाभूल करीत आहेत. श्रीनिवास पाटील ठेकेदारी चालावी म्हणून भाजपच्या संपर्कात आहेत. दिनकर पाटील यांनी वसंतदादा बँकेवर टीका करण्यापूर्वी थकबाकीदारांची यादी पाहावी. प्रसंगी त्यांच्या घरासमोर थकबाकीदारांचे डिजिटल फलक लावू, त्यांनी वसुलीत मदत करावी, असा टोला मदन पाटील यांनी लगावला.