६७ लाखांच्या ठेवी परत करण्याचे सांगली वैभव पतसंस्थेला आदेश, ग्राहक न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:20 IST2025-10-18T18:20:11+5:302025-10-18T18:20:26+5:30
ठेवीदारांना ठेवीची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत मिळाली नव्हती

६७ लाखांच्या ठेवी परत करण्याचे सांगली वैभव पतसंस्थेला आदेश, ग्राहक न्यायालयाचा निकाल
सांगली : येथील सांगली वैभव को-ऑप. क्रेडिट सोसायटीने चौदा प्रकरणातील ठेवीदारांना ठेवीची रक्कम, त्यावरील व्याज, दाव्याचा खर्च व भरपाई खर्चाची रक्कम मिळून ६७ लाख ८१ हजार ६७ रुपये ४५ दिवसांत द्यावेत, असा आदेश येथील ग्राहक न्यायालयाने दिला. न्यायाधीश प्रमोद गो. गिरीगोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील अर्पिता फणसळकर व मनीषा वनमोरे यांच्या पीठाने हा निकाल दिला.
सांगली वैभव को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखा इस्लामपूर शाखेतील ठेवीदारांना ठेवीची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत मिळाली नव्हती. वारंवार मागणी करूनही ठेवीची रक्कम परत मिळाली नाही.
त्यामुळे ठेवीदार गौरी सचिन पाटील, मानसी रंगराव साळुंखे, उज्ज्वला भगवान पाटील, वसंतदादा कृषी शिक्षण व संशोधन केंद्र इस्लामपूर, रंजना रामचंद्र चिवटे, सुशांत भगवान पाटील, विमल अनिल साळुंखे, सूरज भगवान पाटील, हर्षवर्धन सचिन पाटील, कोमल अनिल फिरंगे, सचिन बाळासाहेब पाटील, स्वाती सचिन पाटील, अनिता बाळासाहेब पाटील, शांताबाई आनंदराव पाटील यांनी ग्राहक न्यायालयात ॲड. पंकज देशमुख व ॲड. अरविंद देशमुख यांच्यामार्फत पतसंस्थेविरुद्ध दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन ठेवीदारांना ६७ लाख रूपये द्यावेत, असा आदेश दिला.