घनश्याम नवाथे
सांगली : दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक डॉ. उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ३८, रा. गारपीर चौक, वाळवेकर हॉस्पिटलसमोर, सांगली) याचा वाढदिनीच धारदार शस्त्रांनी घरात घुसून खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मोहिते याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयितांपैकी एकाचा चाकू मांडीत घुसल्याने हल्लेखोर शाहरूख रफीक शेख (वय २६, रा. इंदिरानगर) हा देखील भरपूर रक्तस्त्राव होऊन मृत झाला. मृत शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
दरम्यान उत्तम याच्या खूनप्रकरणी संशयित गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या ऊर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लाेंढे, योगेश शिंदे, समीर ढोले (रा. इंदिरानगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वर्चस्ववाद आणि वाढदिनी झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार दिलेली माहिती अशी, दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्विकारण्यासाठी घरासमोर रस्त्यावरच स्टेज मारले होते. सायंकाळी केक कापण्यात आला. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे व उत्तम मोहिते यांच्यात वर्चस्वातून काही दिवसापासून वाद धुमसत होता. वाढदिनी उत्तम आणि गणेश मोरे यांच्यात वाद झाला. गणेश हा उत्तमच्या अंगावर धावून गेला. तेव्हा उत्तमचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते याने त्याला समजावले. त्यानंतर गणेश तेथून गेला. रात्री पावणे बाराच्या सुमारास गणेश हा साथीदारांना घेऊन उत्तमच्या घराजवळ आला. तेव्हा गर्दी कमी झाली होती.
उत्तमला पाहून हातात शस्त्रे घेऊन हल्लेखोर पळत आले. त्यांना पाहून उत्तम तत्काळ घराच्या दिशेने पळाला. घराचा दरवाजा बंद करण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्याला गाठले. दरवाजा ढकलून आत हॉलमध्ये त्याच्यावर हल्ला चढवला. उत्तमच्या पुतण्याने वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उत्तमच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर उत्तम यांच्यावर हल्ला करत असतानाच एकाचा चाकू हल्लेखोर शाहरूखच्या मांडीत पाठीमागून खोलवर घुसला. त्यामुळे हल्ला सोडून मांडीत रक्त सांडत लंगडत बाहेर आला. घरासमोर आल्यानंतर तो खाली पडला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उत्तम मोहिते याला त्याचा पुतण्या व इतरांनी सिव्हीलमध्ये उपचारास दाखल केले. परंतू तो मृत झाल्याचे सांगितले. काही वेळात मांडीत चाकू घुसलेल्या शाहरूखला जखमी अवस्थेत सिव्हीलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मध्यरात्रीनंतर त्याचाही मृत्यू झाला.
उत्तम मोहिते याचा खून झाल्याची माहिती मिळताच गारपीर चौकात तसेच सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी उसळली होती. सांगली शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विश्रामबाग पोलिसही धावले. तत्काळ परिसरात व सिव्हील हॉस्पिटलमध्ये बंदोबस्त तैनात केला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, शहर ठाण्याचे निरीक्षक अरूण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव आदींनी घटनास्थळी भेट दिली. अधीक्षक घुगे यांनी तातडीने हल्लेखोरांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या. गुन्हे अन्वेषणच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
दोघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार
मृत उत्तम मोहिते याच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, बलात्कार, विनयभंग, मारामारी असे ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरूद्ध हद्दपारीची कारवाई देखील झाली होती. तसेच हल्ल्यावेळी मृत झालेला शाहरूख शेख हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दोन खून, खुनी हल्ला चार ते पाच गु्हे आहेत.
आठजणांविरूद्ध खुनाचा गुन्हा
मृत उत्तम मोहिते याची पत्नी ज्योती यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठजणांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी मुख्य संशयित गणेश मोरे याच्याविरूद्ध दोन खून, खुनी हल्ला असे आठ गुन्हे दाखल आहेत. साथीदार बन्या लाेंढे, अजय घाडगे, समीर ढोले यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत.
सीसीटीव्हीत थरारनाट्य चित्रित
मृत उत्तम मोहिते यांना घराबाहेर आणि आतमध्ये अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामध्ये संशयित हल्लेखोर पळत कसे आले. त्यांनी दार ढकलून हॉलमध्ये तसेच किचनमध्ये कसा हल्ला चढवला. हल्ल्यावेळी शाहरूख शेख याच्यावरही हल्ला झाल्याने तो लंगडत बाहेर आला हा सर्व प्रकार चित्रीत झाला आहे. सर्व थरारनाट्य कॅमेऱ्यात चित्रीत झाल्यामुळे पोलिस तपासाला दिशा मिळाली. शाहरूखच्या मांडीत त्याच्याच साथीदाराचा चाकू घुसल्याचे घडामोडीतून स्पष्ट होत आहे.
Web Summary : Sangli: Dalit leader Uttam Mohite murdered on his birthday. An attacker, Shahrukh Sheikh, also died after being stabbed by an accomplice during the crime. Gang rivalry suspected; police investigating.
Web Summary : सांगली: दलित नेता उत्तम मोहिते की जन्मदिन पर हत्या। शाहरुख शेख नामक एक हमलावर की भी अपराध के दौरान एक साथी द्वारा छुरा घोंपने से मौत हो गई। गिरोह युद्ध का संदेह; पुलिस जांच कर रही है।