सांगलीत चारचाकीने घेतला पेट; पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 13:26 IST2021-09-10T13:26:33+5:302021-09-10T13:26:50+5:30
शिंदे मळा येथे राहणारा अमृता सिताफे या रात्री अकराच्या सुमारास घरी निघाल्या होत्या.

सांगलीत चारचाकीने घेतला पेट; पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात यश
सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा परिषदेजवळ गुरुवारी रात्री चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली.
शिंदे मळा येथे राहणारा अमृता सिताफे या रात्री अकराच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. त्या चारचाकीत एकट्या होत्या. राममंदिर चौकातून पुष्पराज चौकाकडे जाताना चर्चजवळ अचानक चारचाकी गाडीतून धूर आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला घेतले. त्या खाली उतरताच गाडीने पेट घेतला. चारचाकीच्या बाॅनेटमधून आगीचा लोट येत होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे विक्रम घाडगे, सुधीर मोहिते, विजय कांबळे, अमोल गडदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात आली. या आगीत गाडीचा पुढचा भाग जळून खाक झाला. या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.