सांगली ते मुंबई शहीद दौडला आजपासून प्रारंभ; सहभागी धावपटूंच्या हातात मशाल, राष्ट्रध्वज असणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 13:49 IST2023-11-20T13:49:42+5:302023-11-20T13:49:58+5:30
सांगली, तासगाव, रहीमतपूर, सातारा पुणेमार्गे धावपटू मुंबईला पोहोचणार

सांगली ते मुंबई शहीद दौडला आजपासून प्रारंभ; सहभागी धावपटूंच्या हातात मशाल, राष्ट्रध्वज असणार
सांगली : मुंबई येथे २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सांगली ते मुंबई शहीद दौडला आज, सोमवारपासून सुरुवात होणार आहे. सहा दिवसांची दौड पूर्ण करून रविवार, दि. २६ रोजी दौडमध्ये सहभागी धावपटू पोहोचणार आहेत.
शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून शहीद मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किलोमीटर प्रकारात होत असते. सांगलीची ओळख बनलेल्या या स्पर्धेचा एक भाग म्हणून सांगली ते मुंबई शहीद दौडचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी शहरातील शहीद अशोक कामटे चौकातून या दाैडीला सुरुवात होणार आहे. ही दौड कर्मवीर चौकात समाप्त होणार आहे. याठिकाणी दौडीत सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर शहीद दौड मुंबईकडे रवाना होणार आहे.
सांगली, तासगाव, रहीमतपूर, सातारा पुणेमार्गे धावपटू मुंबईला पोहोचणार आहेत. दौडीत सहभागी धावपटू हातात मशाल व राष्ट्रध्वज हातात घेऊन सहभागी असणार आहेत. देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांची पराक्रमाची आणि त्यागाची गाथा देणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरावी या शहीद दौड या उपक्रमाचा हेतू असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष समीत कदम यांनी सांगितले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या दौडीचे तयारी पूर्ण झाली आहे.