सांगलीने बारामतीकरांना शिकविला लेझीमचा ताल; शरद पवारांनी केला गौरव
By अविनाश कोळी | Updated: December 26, 2023 19:11 IST2023-12-26T19:11:14+5:302023-12-26T19:11:37+5:30
सांगली : अस्सल महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा प्रकार जपत त्याला कलात्मकतेचा साज चढविणाऱ्या सांगलीतील विसावा मंडळाच्या कलाकारांनी बारामतीत जाऊन शंभर मुलींना ...

सांगलीने बारामतीकरांना शिकविला लेझीमचा ताल; शरद पवारांनी केला गौरव
सांगली : अस्सल महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा प्रकार जपत त्याला कलात्मकतेचा साज चढविणाऱ्या सांगलीतील विसावा मंडळाच्या कलाकारांनी बारामतीत जाऊन शंभर मुलींना या कलेचे दान दिले. येथील भीमथडी जत्रेत याचे सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही सांगलीकरांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलेला दाद देत त्यांचा गौरव केला.
सांगलीच्या विसावा मंडळाची लेझीम खेळात ख्याती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील रसिकांपर्यंत ते पोहचले आहेत. बारामतीकरांनाही त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे भीमतढी जत्रेच्या निमित्ताने सांगलीच्या विसावा मंडळाच्या कलाकारांना बारामतीला निमंत्रण देण्यात आले. शारदा विद्यामंदिराच्या शंभर मुलींना ही कला शिकविण्यासाठी सांगलीतील कलाकार गेल्या काही दिवसांपासून बारामतीत ठाण मांडून होते.
लेझीमचा कर्णमधूर आवाज, उत्कृष्ट पदलालित्य अन् हलगीच्या तालावर थिरकण्याच्या कलेचे प्रशिक्षण सांगलीच्या कलाकारांनी दिले. अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला हा नृत्यप्रकार अवगत केल्यानंतर बारामतीच्या मुलींनी भीमतढी जत्रेत उपस्थित पुणेकरांची मने जिंकली. बारामतीला कलेचे दान देणाऱ्या विसावा मंडळाच्या कलाकारांचा गौरवही यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. रोहित पवारांनीही सांगलीकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
सांगलीच्या विसावा मंडळाचे संजय चव्हाण, शुभम चव्हाण, पवन चव्हाण, प्रथमेश वैद्य, सुहास चव्हाण, प्रथमेश रिसवडे आदींचा सत्कार करण्यात आला.