Sangli: Subject matter of Takaari, Tembh, Mhaasal ended | सांगली : ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपला

सांगली : ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपला

ठळक मुद्देताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपलातिन्ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता

सांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेच्या कित्येक वर्षांपासूनच्या थकबाकीचा विषय कायमस्वरुपी संपविण्यात आला आहे. एकूण ३८ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी २५ कोटी रुपये आम्ही वर्ग केले आहेत, उर्वरीत रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणार आहे, त्यामुळे रविवारी योजना कार्यान्वित होण्यास कोणतीही अडचण नाही, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनेची एकूण थकबाकी ३८ कोटी ५८ लाख इतकी आहे. यातील २४ कोटी २५ लाख रुपये आम्ही शनिवारी वर्ग केले आहेत. थकबाकीवरील दंड व व्याज माफ करण्याची मागणी आम्ही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. उर्वरीत रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे.

यापुढे आम्ही या तिन्ही योजनांची १ रुपयाचीही थकबाकी ठेवणार नाही, असा शब्द आम्ही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आता आमच्यावर आली आहे. यापुढे शेतकऱ्यांना एकूण बिलाच्या १९ टक्के पाणीपट्टी द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर फारसा आर्थिक ताण पडणार नाही.

लोकांची बिले भरण्याची मानसिकता आहे. ती पाणीपट्टी संकलीत करण्याबाबत राबवाव्या लागणार्‍या यंत्रणेबाबत कृष्णा खोरेअंतर्गत येणार्‍या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकार्‍याची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.

पाणीपट्टी वसुलीबाबतची चौकशी होणार!

यापूर्वी लाभक्षेत्रातील गावच्या प्रमुखांनी शेतकर्‍याकडून पैसे गोळा करून ते भरले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. साखर कारखान्यांबाबतही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच ठोस कारवाई केली जाईल, असे पाटील म्हणाले.

Web Title: Sangli: Subject matter of Takaari, Tembh, Mhaasal ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.