Sangli: जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता
By घनशाम नवाथे | Updated: May 27, 2024 20:13 IST2024-05-27T20:12:44+5:302024-05-27T20:13:05+5:30
Sangli News: नूतन बुध्दिबळ मंडळाच्या वतीने आयोजित भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याने विजेतेपद मिळवले. तर कोल्हापूरचाच सोहम खासबारदार उपविजेता ठरला.

Sangli: जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता
- घनशाम नवाथे
सांगली - नूतन बुध्दिबळ मंडळाच्या वतीने आयोजित भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याने विजेतेपद मिळवले. तर कोल्हापूरचाच सोहम खासबारदार उपविजेता ठरला.
स्पर्धेच्या आठव्या फेरीत कोल्हापूरचा अथर्व चव्हाण व कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात ७ गुणासह आघाडीवर असलेल्या श्रीराजने कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला. अर्ध्या गुणासह श्रीराजने ७.५ गुण मिळवून रोख पारितोषिकासह चषक पटकाविला. अथर्वला पाचव्या स्थानावर जावे लागले.
कोल्हापूरचा सोहम खासबारदार व सातारचा ओंकार कडव यांनीही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला. सोहमने ६.५ गुणासह रोख पारितोषिक व उपविजेतेपद पटकाविले. ओंकारला तिसरे स्थान मिळाले. कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने व कोल्हापूरच्याच संतोष कांबळे याचा ३५ व्या चालीला पराभव करू चौथे स्थान पटकाविले. संतोषळा सोळावे स्थान मिळाले.
कोल्हापूरचा अभय भोसले व मिरजेचा मुदस्सर पटेल यांच्यातील डावात मुदस्सरने अभयचा ३२ व्या चालीला पराभव करून सातवे स्थान पटकाविले. अभयला पंधराव्या स्थानावर जावे लागले. सांगलीच्या आदित्य टिळक याने चितळे डेअरीचा संतोष रामचंद्रे याचा पराभव करून सहावे स्थान मिळवले. संतोषला अठराव्या स्थानावर जावे लागले. सातारच्या उमेश कुलकर्णीने मिलींद नांदळे याचा पराभव करून आठवे स्थान पटकाविले. मिलिंदला सतराव्या स्थानावर जावे लागले. आंध्रप्रदेशच्या मोहमद खाँजा लतिफने कोल्हापूरच्या सारंग पाटील याचा पराभव करून नववे स्थान मिळवले.
सातारच्या अनिकेत बापटने ठाणेच्या अथर्व कदमचा पराभव करून अकरावे स्थान पटकाविले. सांगलीच्या आदित्य चव्हाणने सांगलीच्या नंदकिशोर लिमयेचा पराभव करून दहावे स्थान पटकाविले. कोल्हापूरच्या प्रणव पाटीलने कोल्हापूरच्या अरीन कुलकर्णीचा पराभव करून बारावे स्थान पटकाविले. पारितोषिक वितरण माजी प्राध्यापक, ज्येष्ठ जलतरणपटू रामकृष्ण आराणके, दडगे दुग्धालयाचे सुरेश दडगे यांच्याहस्ते व चिंतामणी लिमये यांच्या उपस्थितीत झाले.