सांगली : राजस्थानातील कोटा जिल्ह्यातून दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून ते कुटुंब सांगलीत आले होते. विश्रामबाग चौकातच रस्त्याकडेला संसार मांडला होता. फुगे विकून ते उदरनिर्वाह करत होते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचे एक वर्षाचे बाळ पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पळवले. बाळ गायब झाल्याचे पाहून कुटुंबाने टाहो फोडला. ते पाहून खाकी वर्दीही गहिवरली. त्यांनी तातडीने शोध घेण्यास सुरूवात केली. तीन दिवसानंतर बाळ चोरणाऱ्या टोळीचा छडा लावला. एकास ताब्यात घेतले. तर दोघे पसार झाले. बाळाला रत्नागिरी जिल्हयातून सावर्डे येथून सुखरूपपणे आणून आईच्या ताब्यात दिले.स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज) याला अटक केली असून त्याचे साथीदार इम्तियाज पठाण, वसीमा इम्तियाज पठाण हे दोघे पसार आहेत. राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी (रा. कनवास, जि. कोटा) हे रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करतात. विश्रामबागला रस्त्याकडेलाच ते पत्नी, एक वर्षाचा मुलगा व मुलगी यांच्यासह राहतात. दि. २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास त्यांचा एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपला असताना तिघांच्या टोळीने या मुलास पळवून नेले. पहाटेच्या सुमारास आईला बाळ जवळ दिसले नाही, म्हणून शोधाशोध सुरू केली. आजूबाजूला सर्वत्र शोध घेऊन बाळ दिसत नाही, म्हंटल्यावर आईने टाहो फोडला. हाकेच्या अंतरावर असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात जाऊन दिसेल त्यांना ‘माझे बाळ मला द्या’ म्हणून विनवणी करू लागली. मातेची धडपड पाहून खाकी वर्दीला पाझर फुटला. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यानी त्यांना तुमचे बाळ सुखरूप आणून देतो अशी ग्वाही दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना हा प्रकार समजताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तातडीने अपहरीत बालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी समांतर तपास सुरू केला.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी संदीप नलावडे, अमिरशा फकीर यांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारामार्फत संशयित इनायत गोलंदाज, इम्तियाज पठाण व वसीमा पठाण यांनी चोरून नेल्याची माहिती मिळाली. इनायत याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बालकाचे अपहरण करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याचे सांगितले. पथकाने तातडीने रत्नागिरी येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. तेव्हा सावर्डे येथील सचिन राजेशिर्के यांच्याकडे बालक मिळाले. चौकशी केल्यानंतर त्यांना मूलबाळ नसल्यामुळे वसीमा पठाण हिच्या मदतीने इनायत व इम्तियाज या दोघांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर बाळ ताब्यात देऊन कायदेशीर प्रक्रिया नंतर पूर्ण करू असे सांगितले होते.पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर ते आईच्या ताब्यात दिले. तीन दिवसानंतर बालक मिळाल्यानंतर ते आईच्या कुशीत सुखरूपपणे विसावले. त्यांना अश्रू लपवता आले नाहीत. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, सहायक निरीक्षक पंकज पवार, चेतन माने, उपनिरीक्षक कुमार पाटील, सहायक फौजदार सपना गराडे, अंमलदार सागर लवटे, नागेश खरात, दरीबा बंडगर, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सतीश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, उदयसिंह माळी, महादेव नागणे, सुनिता शेजाळे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, विनायक सुतार, सूरज थोरात, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, सोमनाथ पतंगे आदींच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.दोघांचा शोध सुरू अटक केलेल्या इनायत याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर इम्तियाज पठाण व वसीमा पठाण या दोघांचा शोध सुरू आहे. इम्तियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, फसवणूक, विनयभंग, आर्मॲक्टचे गुन्हे दाखल आहेत.
Web Summary : Sangli police swiftly rescued a kidnapped one-year-old from Rajasthan within 72 hours. The child was stolen from a family living on the streets. Police arrested one suspect and are searching for two others involved in the kidnapping, reuniting the baby with its mother.
Web Summary : सांगली पुलिस ने 72 घंटों के भीतर राजस्थान से अगवा किए गए एक साल के बच्चे को तेजी से बचाया। बच्चा सड़क पर रहने वाले एक परिवार से चुराया गया था। पुलिस ने एक संदिग्ध को गिरफ्तार किया और अपहरण में शामिल दो अन्य की तलाश कर रही है, बच्चे को उसकी माँ से मिला दिया।