सांगलीत पेट्रोल १०५ रुपयांवर, डिझेल ९५ रुपये प्रतिलिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:11+5:302021-06-28T04:19:11+5:30
सांगली : सांगलीत पेट्रोलच्या किमती शनिवारी १०५ रुपयांवर पोहोचल्या, तर डिझेल ९५ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. इंधनाची ...

सांगलीत पेट्रोल १०५ रुपयांवर, डिझेल ९५ रुपये प्रतिलिटर
सांगली : सांगलीत पेट्रोलच्या किमती शनिवारी १०५ रुपयांवर पोहोचल्या, तर डिझेल ९५ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. इंधनाची दरवाढ थांबण्याचे नाव घेत नसून ग्राहक हैराण झाले आहेत.
तेल कंपन्या एक दिवसाआड पेट्रोल व डिझेलची दरवाढ करीत आहेत. अवघ्या महिन्याभरात पेट्रोलने १०० रुपयांवरून १०५ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सांगलीत शनिवारी पहाटेपासून नव्या, वाढीव दराने विक्री सुरू झाली. रविवारचा दर १०४.४० रुपये असा होता. ग्रामीण भागात १०५ रुपये असा दर राहिला. स्पीड पेट्रोल १०७.२१ रुपयांवर पोहोचले आहे. काही पंपांवर ते १०८ रुपयांना विकले जात आहे.
डिझेलनेदेखील दरवाढीच्या शर्यतीत पेट्रोलचा पाठलाग सुरू केला आहे. सांगलीत रविवारी डिझेल ९४.७७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. ग्रामीण भागात ९५ रुपयांपर्यंत भाववाढ पाहायला मिळाली. दरवाढ अशीच वेगाने सुरू राहिली, तर डिझेल महिन्याअखेरीस ९८ रुपयांवर पोहोचण्याची भीती आहे.
पेट्रोल १०० रुपयांना ९६० मिलीलिटर मिळत आहे. बस व रेल्वेसेवा बंद असल्याच्या काळात स्वत:च्या दुचाकी व चारचाकींशिवाय पर्याय नाही. या स्थितीत पेट्रोल-डिझेलची दरवाढ बजेट कोलमडून टाकणारी ठरली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत फार फरकही उरलेला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मालवाहतूक पूर्णक्षमतेने सुरू नाही, ती सुरू होईल तेव्हा महागलेल्या डिझेलच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.