सांगली महापालिका बंद करणार थकबाकीदारांच्या सुविधा, वसुलीसाठी प्रशासनाची कडक मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:40 IST2025-08-06T12:39:50+5:302025-08-06T12:40:42+5:30
प्रशासनाने कर वसुलीसाठी दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली

सांगली महापालिका बंद करणार थकबाकीदारांच्या सुविधा, वसुलीसाठी प्रशासनाची कडक मोहीम
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराच्या थकीत वसुलीसाठी प्रशासनाने कडक मोहीम आखली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कराची ९४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. जप्तीच्या कारवाईसह आता संबंधित थकबाकीदारांच्या नागरी सुविधा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेने ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या २ हजार ९५ मालमत्ताधारकांना आणि ५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ३४ हजार १९५ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या आहेत. निर्धारित मुदतीपर्यंत कर न भरल्यास संबंधित मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. आवश्यक असल्यास लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच, काही थकबाकीदारांच्या पाणीपुरवठ्यासह अन्य नागरी सुविधा तात्पुरत्या बंद करण्याचीही तयारी करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार भागनिहाय जप्ती व वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. प्रशासनाने कर वसुलीसाठी दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. नागरी सेवा आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने ही कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर थकबाकीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी त्वरित थकीत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अन्यथा जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
थकबाकीचा डोंगर वाढला
- थकबाकी : ९४ कोटी
- चालू मागणी : ७४ कोटी
- एकूण उद्दिष्ट : १६८ कोटी
- एकूण वसुली : ४० कोटी