सांगली महापालिकेने १३ व्यवसायांना परवान्यातून वगळले, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:18 IST2025-09-03T19:18:12+5:302025-09-03T19:18:46+5:30
शहरातील व्यावसायिकांना महापालिकेने बाजार परवाना बंधनकारक केला होता. त्यावरून व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती

सांगली महापालिकेने १३ व्यवसायांना परवान्यातून वगळले, पण..
सांगली : शहरातील व्यावसायिकांना महापालिकेने बाजार परवाना बंधनकारक केला होता. त्यावरून व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता आयुक्त सत्यम गांधी यांनी बाजार परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी केल्यानंतर पुन्हा १३ व्यवसायांना परवान्यातून वगळले आहे. या व्यवसायांना परवान्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यात भांडी, कपडे, ब्युटीपार्लर, टेलरिंग अशा व्यवसायांचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रात २० ते २५ हजार व्यावसायिक आहेत. त्यातील केवळ ४२०० व्यावसायिकांनी महापालिकेचा परवाना घेतला आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्त गांधी यांनी सर्व व्यावसायिकांना बाजार परवाना बंधनकारक केला. त्यासाठी व्यावसायिकांना ११ कागदपत्रे द्यावी लागणार होती. याला व्यापारी संघटनांनी विरोध केला. आयुक्तांनी कागदपत्रांची संख्या ११ वरून दोनवर आणली. केवळ ओळखपत्र व वैध भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे परवाने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बाजार परवान्यातील १३ व्यवसायांना वगळण्यात आल्याचे गांधी यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
यामध्ये बचतगट, शालेय पोषण आहार, नेचर थेरेपी, फिजोथेरपी, योगा, पंचकर्म, कपडे, भांडी, ब्युटीपार्लर, गिफ्ट शॉपी, पुस्तके, आहारतज्ज्ञ, टेलरिंग या व्यवसायाचा समावेश आहे. त्यांना आता परवान्याची गरज नाही. पण, या व्यवसायधारकाकडे इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. अन्य व्यवसायाबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असेही गांधी यांनी सांगितले.
बाजार परवानाची अंमलबजावणीच बेकायदेशीर आहे. त्याला महासभेची मान्यता नाही. त्याचे अधिकार आयुक्तांकडे आहे का? हा खरा प्रश्न आहे. कोणत्या व्यवसायाला वगळावे, कुणाचा समावेश करावा, याबाबत व्यापारी संघटनांशी चर्चा अपेक्षित होती. पण, महापालिकेने चर्चा न करताच काही व्यवसायांना वगळले आहे. भविष्यात महासभेकडून पुन्हा या व्यावसायांचा परवान्यात समावेश होणार नाही, याची लेखी पत्र आयुक्तांनी संघटनेला द्यावे.- समीर शहा, अध्यक्ष व्यापारी एकता असोसिएशन