‘लोक’जागर: सांगलीची नाट्यपंढरीकडून सांस्कृतिक राजधानी होण्याकडे वाटचाल

By हणमंत पाटील | Published: January 1, 2024 04:43 PM2024-01-01T16:43:35+5:302024-01-01T16:44:20+5:30

हणमंत पाटील सांगलीला दीडशे ते दोनशे वर्षांची नाटक, साहित्य, कला, संगीत व सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. १८४३ साली विष्णुदास ...

Sangli move from theater pandhari to cultural capital | ‘लोक’जागर: सांगलीची नाट्यपंढरीकडून सांस्कृतिक राजधानी होण्याकडे वाटचाल

‘लोक’जागर: सांगलीची नाट्यपंढरीकडून सांस्कृतिक राजधानी होण्याकडे वाटचाल

हणमंत पाटील

सांगलीला दीडशे ते दोनशे वर्षांची नाटक, साहित्य, कला, संगीत व सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ हे पहिले नाटक येथे सादर केल्याने नाट्यपंढरी म्हणून सांगलीला ओळखले जाऊ लागले. ही परंपरा आजही सांगलीतील नाट्यकलावंत, श्रोते व रसिकांनी जपली आहे. त्यामुळेच नवीन वर्षांत जानेवारी २०२४ ला होणाऱ्या १०० व्या मराठी नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा २९ डिसेंबरला नाट्यपंढरीत झाला. ही प्रत्येक सांगलीकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, इथल्या राजकीय इच्छाशक्तीअभावी हे संमेलन पुण्यातील नेत्यांनी तिकडे नेले, हे वास्तव नाकारता येणार नाही.


राज्याची सांस्कृतिक राजधानी हे बिरूद घेऊन वावरणाऱ्या पुण्याचा विकासाची वाटचाल झपाट्याने महानगराकडे सुरू आहे. तसे त्यांचे सांस्कृतिकपण हरवत चालले आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचे, वाढविण्याचे व संवर्धनाचे प्रयत्न गावागावांत आजही सुरू आहेत. त्यामुळेच नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढ सोहळ्यासाठी आलेले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी व चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगलीतील सांस्कृतिक परंपरेचे व रसिक श्रोत्यांचे कौतुक केले.

सांगलीतील सांस्कृतिक परंपरा जपण्याचे मुख्य श्रेय इथल्या रसिक, श्रोते व साहित्य वाचकांचे आहे. त्यांच्यामुळेच इथली नाट्य, संगीत, साहित्य व कला अजूनही जिवंत आहे.

विष्णुदास भावे, नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, नटसम्राट बालगंधर्व यांनी सांगलीत नाट्यपरंपरेची भक्कम पायाभरणी केली. ही नाट्यपरंपरा व चळवळ आजही विविध संस्था व संघटनांनी पुढे चालू ठेवली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर व मास्टर अविनाश यांनी संगीत रंगभूमी गाजविण्यास सांगलीतून सुरुवात केली. ही संगीत परंपरा गानसम्राज्ञी लता मंगेशकर व आशा भोसले यांनी जगभर पोहोचविली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर, कविवर्य ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर, कवी सुधांशू, म. भा. भोसले व चारुतासागर यांनी साहित्यक्षेत्रात सांगलीचे नाव मोठे केले. साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची ही परंपरा ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. तारा भवाळकर व वसंत केशव पाटील यांनी कायम ठेवली आहे.

म्हणूनच सांगली जिल्ह्यातील कुंडल, पलूस, भिलवडी, औदुंबर, शिराळा, कामेरी, इस्लामपूर, विटा, रेणावी, बलवडी, आटपाडी, कवठेएंकद, देशिंग, कवठेमहांकाळ, मिरज, कुपवाड व सांगली शहरांतील विविध संस्था साहित्य संमेलन, कीर्तन महोत्सव, व्याख्यानमाला, नाट्य, एकांकिका, अभिवाचन व वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घेतात. त्यासाठी कुंडलचा साखर कारखाना, महापालिका, सांगली अर्बन बँक, कर्मवीर पतसंस्था, शाळा-कॉलेज, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था, वाचनालये व युवक मंडळीही आयोजनासाठी पुढाकार घेतात. त्यासाठी चितळे डेअरी, पु. ना. गाडगीळ पेढीसारखे व्यावसायिक व उद्योजक आर्थिक भार उचलण्यासाठी पुढे येताना दिसतात. त्यामुळेच नाट्यपंढरीची वाटचाल सांस्कृतिक राजधानीकडे जोमाने सुरू आहे. त्याला राजकीय पाठबळाची व इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.

Web Title: Sangli move from theater pandhari to cultural capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली