दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय?

By हणमंत पाटील | Published: March 3, 2024 12:27 PM2024-03-03T12:27:58+5:302024-03-03T12:44:32+5:30

सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला.

Sangli Lok Sabha Constituency will be contested between Sanjay Patil, Chandrahar Patil and Vishal Patil | दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय?

दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय?

हणमंत पाटील 

सांगली :
गत पंचवार्षिक सांगलीलोकसभानिवडणूक तिरंगी झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होऊन भाजपचे संजय पाटील यांचा विजय सोपा झाला. हीच खेळी भाजपकडून पुन्हा खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार की अपक्ष उमेदवार चंद्रहार पाटील रिंगणात उतरल्यास तिरंगी होणार आहे. यावर सांगलीचा भावी खासदार ठरण्याची शक्यता आहे. 

सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले संजय पाटील हे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले गोपीचंद पडळकर यांनी ऐनवेळी वंचित बहुजन विकास आघाडीची उमेदवारी घेतली. कॉंग्रेसच्या मतात फूट पडल्याने त्यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाली. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावरील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव होऊन संजय पाटील हे दुस-यांदा भाजपचे खासदार झाले. 

आगामी लोकसभा निवडणुकीत हॅट्रीक करण्याचे मनसुबे आखलेल्या खासदार पाटील यांनी मतदारसंघातील गावागावात आपला गट तयार केला आहे. परंतु, पक्षांतर्गत रोष रोखण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पक्षाचे विद्यमान आमदार व पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच, पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार बदलाची मागणी होत असलतरी खासदार पाटील यांना पर्याय देणारा तगडा उमेदवार भाजपकडे सध्यातरी नाही. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व दीपक शिंदे यांच्याकडून जिल्ह्यात दौरे सुरू आहेत. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार बदलायची की पुन्हा संजय पाटील यांनाच संधी द्यायची, या द्वीधामनस्थितीत पक्षाश्रेष्ठी आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या पहिल्या यादीत पाटील यांचे नाव नाही. 

विशाल पाटील यांना कॉंग्रेस की शिवसेनेची उमेदवारी ?
 
गतपंचवार्षिक निवडणुकीतील विशाल पाटील यांच्या कॉग्रेसच्या उमेदवारीवरून शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता. ऐनवेळी विशाल यांनी स्वाभिमानीची उमेदवारी घेतली.  कॉंग्रेसऐवजी स्वाभिमानीकडून लढल्याने कॉंग्रेसच्या हक्काच्या मतांपासून ते वंचित राहिले. कॉंग्रेसची काही मते वंचितचे उमेदवार पडळकर यांच्याकडे झुकल्याने भाजपची खेळी यशस्वी ठरली. आता कोल्हापूरची शिवसेनेची जागा शाहू छत्रपती यांना सोडून सांगलीची जागा शिवसेनेला देण्याची महाविकास आघाडीत चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या हक्काची सांगलीची जागा शिवसेनेला सोडावी लागली. तर विशाल हे कॉंग्रेसचे उमेदवार राहणार की शिवसेनेची उमेदवारी स्वीकारणार याविषयी उत्सुकता आहे. 

वंचित, स्वाभिमानीचा दावा...

गतपंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसऐवजी स्वाभिमानीची उमेदवारी विशाल पाटील यांनी घेतली.  त्यामुळे या मतदारसंघावर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शट्टी यांचा दावा आहे. तर दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे वंचितनेही महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर सांगली मतदारसंघावर दावा केला आहे. चंद्रहार यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्यात भाजप यशस्वी झाला. तर गतवर्षांप्रमाणे पुन्हा एकदा तिरंगी लढत होऊ शकते. तिरंगी ऐवजी दुरंगी लढत होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. 

२०१९ च्या सांगली लोकसभेतील मतदान 
उमेदवार              पक्ष           मतदान 
१) संजय पाटील    भाजप         ५, ०८,९९५
२) विशाल पाटील   स्वाभिमानी    ३,४४,६४३
३) गोपीचंद पडळकर वंचित       ३,००,२३४

सांगली लोकसभेतील विधानसभानिहाय मतदार

मिरज : ३,१९,९९९
सांगली : ३,३१, ६५२
जत  : २,७९, ५२७
खानापूर -आटपाडी : ३,३२,०५३
पलूस-कडेगाव   : २,८३,००५
तासगाव-कवठेमहांकाळ : २,९८,२२०

एकूण मतदार : १८,४४, ४५६

सांगली लोकसभेतील आमदार

भाजप :       २ 
कॉंग्रेस :       २ 
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) : १ 
शिवसेना (शिंदे गट) : १

Web Title: Sangli Lok Sabha Constituency will be contested between Sanjay Patil, Chandrahar Patil and Vishal Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.