सांगली, किर्लोस्करवाडीतून रेल्वेचे बोर्डिंग तिकीट देण्यास नकार; प्रवाशांमधून संताप
By अविनाश कोळी | Updated: April 29, 2025 18:35 IST2025-04-29T18:33:59+5:302025-04-29T18:35:03+5:30
नागरिक जागृती मंचकडून महाव्यवस्थापकांकडे तक्रार

सांगली, किर्लोस्करवाडीतून रेल्वेचे बोर्डिंग तिकीट देण्यास नकार; प्रवाशांमधून संताप
सांगली : किर्लोस्करवाडी व सांगली स्थानकावर थांबा मंजूर असलेल्या गाड्यांची तिकिटे काढताना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अन्य स्थानकावरून बोर्डिंग तिकीट दिले जात असल्याचा प्रकार नागरिक जागृती मंचने उजेडात आणला. दोन्ही स्थानके नामशेष करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
सांगली व किर्लोस्करवाडीत थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे इतर रेल्वे स्टेशनच्या नावाने दिली जात आहेत. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवरील तिकीट विक्री कमी दिसते. याचाच फायदा घेत येथील थांबे रद्द करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली रेल्वे स्थानकावर चंडीगड ते नवी दिल्ली जाणाऱ्या यशवंतपूर-चंडीगड संपर्क क्रांतिची १२ जून नंतरची तिकीटे मुद्दामहून सांगलीऐवजी मिरज स्थानकाची घेण्याची अन्यायकारक सक्ती मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. जेणेकरून संपर्क क्रांतीचा सांगलीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा आहे.
किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दिल्ली जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसची १० जूननंतरची तिकीटे मुद्दामहून किर्लोस्करवाडीऐवजी मिरज किंवा कराड स्थानकाची घेण्याची सक्ती केली जात आहे. जेणेकरून या गाडीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव आहे.
नियम काय सांगतो?
रेल्वे बोर्डाचा नियम आहे की, प्रवाशाने ज्या स्थानकाची आरक्षित तिकिटे मागितली आहेत, त्या स्थानकाची आरक्षित तिकिटे रेल्वे प्रशासनाने प्रवाशाला द्यावीत. पण, हा नियम धाब्यावर बसवून सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावर त्याच स्टेशनची बोर्डिंग तिकीट प्रवाशांना दिली जात नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे.
आंदोलन करण्याचा इशारा
किर्लोस्करवाडीतून बोर्डिंगची तिकीट विक्री जर मध्य रेल्वेने सुरू केली नाही, तर सर्वपक्षीय समिती, तसेच सांगली व किर्लोस्करवाडी येथील प्रवासी संघटनांची बैठक बोलवून जनआंदोलनाची दिशा ठरवून, असा इशारा सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.
सहा महिन्यांत ११ हजार तिकिटे विक्री
गेल्या सहा महिन्यांत सुमारे ११ हजार आरक्षित व अनारक्षित तिकिटे घेऊन प्रवाशांनी सांगलीवरून संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये प्रवास केला आहे. गोवा एक्स्प्रेस गाडीत आरक्षित व अनआरक्षित मिळून सुमारे ३ हजारांच्या आसपास प्रवाशांनी किर्लोस्करवाडीवरून प्रवास केला आहे. ज्याच्यामुळे रेल्वे विभागाला अतिरिक्त कमाईसुद्धा झाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार
नागरिक जागृती मंचने मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना, तसेच मध्य रेल्वे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांना पत्र लिहिले असून सांगली व किर्लोस्करवाडी स्थानकावरून तिकिटे नाकारली जात असल्याची तक्रार केली आहे.