सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात भ्रूणांचे अवशेष सापडले : डीएनए तपासणीसाठी पाठविले; सांगलीतहीे खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:33 IST2018-09-29T13:31:18+5:302018-09-29T13:33:00+5:30
येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये महिलांचा गर्भपात केल्यानंतर दफन केलेल्या भ्रूणांचे अवशेष कोल्हापूर जिल्ह्यात सापडले आहेत.

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात भ्रूणांचे अवशेष सापडले : डीएनए तपासणीसाठी पाठविले; सांगलीतहीे खोदकाम
सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये महिलांचा गर्भपात केल्यानंतर दफन केलेल्या भ्रूणांचे अवशेष कोल्हापूर जिल्ह्यात सापडले आहेत. तपासाच्याद्दष्टिने हा महत्वाचा पुरावा असल्याने हे अवशेष ‘डीएनए’साठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. सांगली जिल्ह्यातही निर्जन ठिकाणी भ्रूणांचे दफन करण्यात आले आहेत. याठिकाणी खोदकाम करुन अवशेषांचा शोध घेतला जात आहे.
पंधरा दिवसापूर्वी गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते. हॉस्पिटलची प्रमुख डॉ. रुपाली चौगुले तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले, विट्यातील डॉ. अविजीत महाडिक व उत्तर तांबवे (ता. कºहाड) येथील औषध विक्री प्रतिनिधी सुजीत कुंभार या चौघांना अटक केली आहे. डॉ. रुपालीचा भाऊ डॉ. स्वप्नील जमदाडे छापा पडल्यापासून फरारी आहेत. त्याने अटकपूर्व जामीन घेण्यासाठी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. दोन दिवसापूर्वी विट्यातील डॉ. ऋषिकेश मेटकरी याचेही नाव निष्पन्न झाले आहे. पण पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच तो पसार झाला आहे. या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. डॉ. महाडिक व डॉ. मेटकरी हे दोघेही गर्भलिंगनिदान करुन महिलांना गर्भपातासाठी चौगुले हॉस्पिटलमध्ये पाठवित असल्याचा संशय आहे. त्याद्दष्टिने पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
महिलांचा गर्भपात केल्यानंतर भ्रूणांचे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडे दिली होती. नातेवाईकांनी हे भ्रूण त्यांच्या शेतात किंवा निर्जन ठिकाणी दफन केले आहेत. गर्भपात केलेल्या २५ महिलांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. या सर्व महिला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. महिलांच्या पतीकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी भ्रूण दफन केलेली जागा पोलिसांना दाखविली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात खुदाई करुन भ्रूणांचा शोध घेतला. नागाव-कवठे (ता. तासगाव), कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी, जांभळी व जयसिंगपूर आदी गावात खुदाई करण्यात आली. एका गावात भ्रूणांचे अवशेष सापडले आहेत. ज्या महिलेच्या भ्रूणाचे अवशेष आहेत, त्या महिलेचा यापूर्वीच जबाब घेण्यात आला आहे. तिच्या रक्ताचे नमुने व या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’साठी पाठविण्यात आहेत. पुढील आठवड्यात त्याचा अहवाल येईल. अवशेष सापडल्याने तपासात हा मोठा पुरावा सापडला आहे.