Sangli: मिरजेत नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यास अटक, ८० गोळ्या जप्त
By शरद जाधव | Updated: May 23, 2023 18:45 IST2023-05-23T18:45:06+5:302023-05-23T18:45:24+5:30
Crime News: सांगली, मिरज शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने मिरजेत रेकाॅर्डवरील गुन्हेगाराकडून नशेच्या ८० गोळ्या जप्त केल्या.

Sangli: मिरजेत नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यास अटक, ८० गोळ्या जप्त
- शरद जाधव
सांगली : सांगली, मिरज शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने मिरजेत रेकाॅर्डवरील गुन्हेगाराकडून नशेच्या ८० गोळ्या जप्त केल्या. गौस हुसेन बागवान ऊर्फ गौस शेख (वय २५, रा. नदाफ गल्ली, मिरज) असे संशयिताचे नाव आहे.
जिल्ह्यात बेकायदेशीरपणे मानसिक आजारावरील गोळ्यांचा नशेसाठी वापर केला जात आहे. यावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संदेश नाईक, मनिषा कदम यांच्यासह एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांचे पथक मिरज परिसरात गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, संशयित बागवान नशेच्या गोळ्या विक्रीसाठी घेऊन येणार आहे. त्यानुसार मिरज येथील दर्गा रोडवरील मंगल टॉकीजजवळ छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे ‘नायट्रासन’ या गोळ्यांच्या आठ पट्ट्या मिळाल्या. याबाबत त्यांच्याकडे अजून चौकशीत त्याने शाहबाज शेख ऊर्फ जॅग्वार (रा. कर्नाळ रोड, सांगली) याच्याकडून विक्रीसाठी या गोळ्या घेतल्याचे सांगितले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संजय कांबळे, राजू शिरोळकर, संकेत मगदूम आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
मेंदूवर गुंगीकारक परिणाम
मिरजेत सापडलेल्या या गोळ्यांमुळे मेंदूवर गुंगीकारक परिणाम होता. हे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देणे चुकीचे आहे. असा प्रकार कोणी करत असल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले.