सांगली जिल्ह्यात लवकरच चिकित्सा-व्यसनमुक्ती केंद्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:59 IST2025-05-03T13:59:06+5:302025-05-03T13:59:33+5:30
अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचार

सांगली जिल्ह्यात लवकरच चिकित्सा-व्यसनमुक्ती केंद्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही
सांगली : अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचारासाठी कायम स्वरूपी चिकित्सा व व्यसनमुक्ती केंद्र लवकरच सुरू करत आहोत अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पोलिस परेड क्रीडांगणावर महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, अमली पदार्थ विरोधी कारवाई, प्रबोधन व व्यसनमुक्ती यांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या संकटाचे लवकरच समूळ उच्चाटन होईल. पालकमंत्री पदी नियुक्ती झाली, तेव्हा अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे आव्हान उभे होते. परंतु टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्वांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात अमली पदार्थ विरोधी एकूण ४१ गुन्हे दाखल झाले.
त्यामध्ये ६२ आरोपींना अटक करून जवळपास ३० कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात यश आले. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचारासाठी कायम स्वरूपी चिकित्सा व व्यसनमुक्ती केंद्र लवकरच सुरू करत आहोत. प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्याप्रमाणे खबऱ्यांना बक्षीस ही देण्यात येत आहे.
ते म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून सांगली व मिरजेच्या शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री व सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागासाठी लॅप्राॅस्कोपिक मशीन सुरू केले आहे. शासकीय रूग्णालयात चार हजारहून अधिक प्रसूती व दीड हजारहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या.
खेळाडू, पोलिस आदींचा सन्मान
शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित जिल्ह्यातील पाच खेळाडू, राष्ट्रपती पदकाने सन्मानित महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायरमन कासाप्पा माने, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गौरवलेले महानगरपालिकेचे सुनील माळी, बाबूराव कोळी आणि राजेंद्र कदम, पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित सहा अंमलदारांचे पालकमंत्री पाटील यांनी अभिनंदन केले.
या संस्थांचे अभिनंदन
महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षणगृह या संस्थेस उत्कृष्ट निरीक्षण गृह तसेच भगिनी निवेदिना प्रतिष्ठान संचलित मुलींच्या बालगृहास बालस्नेही पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेतील निकिता अभ्यंकर ही परिचारिका पदावर रायगड येथे, दिलासा भवन मिरजेतील प्रथमेश चौगुले याची कर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
अपंग जवानास मदत
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अति उंच भागात कर्तव्य पार पाडताना दोन्ही पायांना हिमबाधा झाल्याने अपंगत्व आलेले जवान धाकरेश बापू जाधव यांना सैनिक कल्याण विभागातून वीस लाखांची आर्थिक मदत पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दिली.