HSC Exam Result 2025: सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के; गतवर्षीपेक्षा झाली वाढ, कोणत्या शाखेची टक्केवारी सर्वाधिक.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:50 IST2025-05-06T15:50:16+5:302025-05-06T15:50:41+5:30
सांगली : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के लागला. ऑनलाइन निकालानुसार इस्लामपुरातील तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले ...

संग्रहित छाया
सांगली : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के लागला. ऑनलाइन निकालानुसार इस्लामपुरातील तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. शिराळा तालुक्याने ९७.६७ टक्के गुणांसह सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात आघाडी कायम राखली आहे. ६६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.०२ टक्के आहे. कोल्हापूर विभागात सांगली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी दुपारी १ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी मोबाइलमध्ये लक्ष केंद्रित केले होते. संकेतस्थळावर ताण असल्याने ते सुरू होत नसल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. अनेक महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला. उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात जल्लोष केला.
एकूण ३२५ कनिष्ठ महाविद्यालयांतील १६ हजार १६८ विद्यार्थी आणि १५ हजार ३९ विद्यार्थिनी अशा एकूण ३१ हजार २०७ परीक्षार्थींनी ५१ केेंद्रांवर परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार ६२८ विद्यार्थी आणि १४ हजार ५१७ विद्यार्थिनी असे एकूण २९ हजार १४५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ९०.४७ टक्के तर मुलींची टक्केवारी ९६.५२ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.०२ टक्के लागला.१७ हजार ९१० परीक्षार्थींपैकी १७ हजार ५५७ उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ८२.९६ टक्के लागला. ८ हजार १६२ परीक्षार्थींपैकी ६ हजार ७७२ उत्तीर्ण झाले. वाणिज्यचा निकाल ९४.२८ टक्के लागला. ४ हजार २०१ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९६१ उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९२ टक्के लागला. ९०० परीक्षार्थींपैकी८२८ उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ६१.६८ टक्के आहे. १ हजार २७१ पैकी ७८४ उत्तीर्ण झाले.
तालुकानिहाय निकाल असा :
शिराळा ९७.६७, कडेगाव९६.६३, पलूस ९६.२१, जत ९२०, मिरज ९५.४५, खानापूर ९४.४७, वाळवा ९६.८५, तासगाव ९३.२१, आटपाडी ९२.६८, कवठेमहांकाळ ९६.६७, महापालिका क्षेत्र ९०.२८ टक्के
०.७६ टक्के वाढ
गेल्या वर्षी बारावी निकालाची टक्केवारी ९२.६३ टक्के होती. यंदा यामध्ये ०.७६ टक्के वाढ झाली. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. सातारा जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. गुणपडताळणीसाठी ६ ते २० मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.