सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगात सांगली जिल्हा देशात दुसरा, राज्यात पहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:38 IST2025-03-19T13:37:55+5:302025-03-19T13:38:12+5:30
५३८ लाभार्थ्यांना साडेबारा कोटींचे अनुदान

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगात सांगली जिल्हा देशात दुसरा, राज्यात पहिला
सांगली : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये जिल्ह्यातील ५३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली. ही योजना राबविण्यात सांगली जिल्हा देशात द्वितीय स्थानी व राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.
२०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांसाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाने ही योजना लागू केली आहे. सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचा विस्तार वाढविणे, नवीन उद्योगांसाठी प्रोत्साहन देणे, असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे असा हेतू आहे. जिल्ह्यात २०२० पासून १ हजार २६७ प्रकल्प मंजूर झाले आहेत. लाभार्थ्यांना ३६ कोटी ३७ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
सन २०२४-२५ यावर्षी ५३८ लाभार्थ्यांच्या उद्योगांना मंजुरी मिळाली. त्यांना १२ कोटी ६७ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. बेदाणा प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, बेकरी पदार्थ, पशुखाद्यनिर्मिती इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश आहे. या योजनेद्वारे सुमारे ३ हजार ४६५ कामगारांना रोजगार निर्माण झाले.
कुंभार म्हणाले, २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ४७८ प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ५३८ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेत जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. १ हजार २७२ वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहायता गट लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे.