'ओटीएस'मधून सांगली जिल्हा बँक ५०० कोटी वसूल करणार - मानसिंगराव नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:38 IST2025-08-28T18:38:17+5:302025-08-28T18:38:27+5:30
जिल्ह्यातील ४० हजारांवर सभासदांना होणार लाभ

'ओटीएस'मधून सांगली जिल्हा बँक ५०० कोटी वसूल करणार - मानसिंगराव नाईक
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने थकबाकीदार शेतकरी, सहकारी संस्थांसाठी पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस ) लागू केली आहे. या योजनाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दहा हजारांवर थकबाकीदार शेतकरी तसेच ३५ ते ४० थकबाकीदार सहकारी संस्थांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.
मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बॅँकेने शेतकरी, सभासद संस्थांसाठी ओटीएस योजना जाहीर केली आहे. यापूर्वीही बॅँकेने सदर योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्या योजनेची मुदत संपल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा या योजनेची मागणी करण्यात आली. त्यानुसार बॅँकेने शेतकऱ्यांसाठी ' वसुली प्रोत्साहन निधी ' ही योजना आणली आहे. त्यातर्गत शेतकऱ्यांकडील अल्प, मध्यम व दीर्घ मुदत कर्जाचे ३० जून २०२१ पूर्वी थकीत असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत.
या योजनेत शेतकऱ्यांना दिलेल्या व्याजातील सूट, सवलतीपोटी विकास संस्थांना ५ टक्क्यांप्रमाणे वसुली प्रोत्साहन निधी जिल्हा बँक देणार आहे. थकबाकीदार सहकारी संस्थांसाठी जिल्हा बॅँकेने एकरकमी, सामोपचार (ओटीएस) परतफेड योजना आणली आहे. या योजेनेत मार्च २०२२ पूर्वीच्या थकबाकीदार संस्था, कंपनी व व्यक्तींना सहभाग घेता येणार आहे. बॅँकेने थकीत कर्जापोटी सरफेसी कायद्यातंर्गत विक्रीस काढलेल्या मालमत्ता बॅँकेने खरेदी केलेल्या असाव्यात.
ओटीएस योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा
ओटीएस स्वीकारल्यापासून १५ दिवसांत तडजोड रक्कम भरणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्च २०२५ अखेरच्या एकूण व्याजापैकी २५ टक्के व्याजाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. ओटीएस योजनेचा कालावधी ६ महिन्यांचा आहे. या वेळेत कर्ज सहा हप्त्यांत परतफेड करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकेचा मदतीचा हात
जिल्हा बॅँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी वसुली प्रोत्साहन निधी योजना आणली आहे. कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने यापूर्वी मदतीचा हात दिला होता. आता पुन्हा ही योजना सुरू करण्यात येत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजना लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले आहे.