सांगली जिल्हा बँक १० हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडणार, मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:40 IST2025-03-29T14:40:08+5:302025-03-29T14:40:25+5:30
ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत असेल

सांगली जिल्हा बँक १० हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडणार, मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के
सांगली : जिल्हा बँकेची सुरुवात २८ मार्च १९२७ मध्ये पाच हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झाली होती. अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हा बँकेने आठ हजार २७५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला असून, पुढील आर्थिक वर्षात १० हजार कोटी ठेवींचा टप्पा पार करणार आहे, असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच, बँकेचा मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के, तर ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेची स्थापना सांगलीचे पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी पाच हजार रुपयांच्या भांडवलावर केली होती. पुढे अनेक मान्यवरांच्या प्रयत्नामुळे गेल्या ९८ वर्षांत बँकेन स्वत:चे भाग भांडवल १९० कोटी केले आहे. तसेच, आठ हजार २७५ रुपयांच्या ठेवी केल्या असून, सात हजार २०० कोटी रुपयांची कर्ज वाटप केले आहेत. १५ हजार ५०० कोटींचा वार्षिक व्यवसाय होत आहे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे.
बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के, तर ग्रॉस एनपीए ७.५० टक्के झाला आहे. पुढील आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी १० हजार कोटींवर आणि नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत आणण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बँकेच्या नवीन १० शाखांना रिझर्व बँकेन मंजुरी दिल्यामुळे २२८ शाखा झाल्या आहेत. जिल्हा बँके आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास माजी मंत्री जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांची प्रामाणिक कामगिरी कारणीभूत आहे.
पशुपालनासाठी बिनव्याजी तीन लाखांपर्यंत कर्ज
शेळ्या, मेंढ्या, कोंबडी व गाई, म्हशी पशुपालनासाठी पशुपालकांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. दि. १ एप्रिल २०२५ पासून योजनेची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
मार्च २०२६ मध्ये बँकेचे शतक महोत्सव वर्ष
जिल्हा बँकेची स्थापना २८ मार्च १९२७ मध्ये झाली असून, बँकेने ९९ वर्षांत पदार्पण केले आहे. मार्च २०२६ मध्ये बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त देशपातळीवरील बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलवून वर्षभर महिन्याला एक कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे, असेही मानसिंगराव नाईक व वाघ यांनी दिली.