सांगलीत अट्टल चोरट्यास अटक
By Admin | Updated: January 29, 2015 00:17 IST2015-01-28T23:41:44+5:302015-01-29T00:17:55+5:30
१२ दुचाकी जप्त : शहर पोलिसांची कारवाई; आणखी गुन्हे उघडकीस येणार

सांगलीत अट्टल चोरट्यास अटक
सांगली : शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने आकाश ऊर्फ बाबू तुकाराम घनवट (वय २९, रा. राजापूर, जि. सातारा, सध्या रा. मेकळ, जि. पुणे) या अट्टल दुचाकी चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून एकूण साडेतीन लाख
रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. सांगली शहरासह सातारा
जिल्ह्यातून या दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
सांगलीमध्ये गेल्या वर्षभरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी कोणत्याही परिस्थितीत चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एस. सी. पांचाळ, उपनिरीक्षक वाय. बी. कामटे, आदींच्या पथकाने सापळा रचून आकाश घनवट यास अटक केली. तो सांगलीच्या गणपती पेठ येथे दुचाकी चोरताना रंगेहात सापडला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, तो अट्टल दुचाकी चोरटा असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी दुचाकी त्याच्याकडून जप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिली.
घनवट याने या दुचाकी सातारा जिल्ह्यातील वडूज, दहीवडी, फलटण आदी ठिकाणांहून चोरल्या असून, सांगलीमध्ये गणपती पेठ व वखारभागातूनही काही दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद केली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे करीत आहेत. (प्रतिनिधी)
पाच हजारांत दुचाकी
घनवट याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या सर्व दुचाकी एकाच कंपनीच्या आहेत. चोरी केल्यानंतर त्याने या दुचाकींची केवळ चार ते पाच हजाराला विक्री केली आहे. उर्वरित रक्कम नंतर नेतो, कागदपत्रे देतो, असे सांगून त्याने खरेदीदारांना फसविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.