सांगली : आमराई पोलीस चौकी महापालिकेने पाडली

By Admin | Updated: September 20, 2014 00:31 IST2014-09-19T23:40:19+5:302014-09-20T00:31:15+5:30

ठरावानंतर कारवाई : रस्त्यास अडथळ्याचे कारण

Sangli: Aamrai police chowki nabbed municipal corporation | सांगली : आमराई पोलीस चौकी महापालिकेने पाडली

सांगली : आमराई पोलीस चौकी महापालिकेने पाडली

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने आज, शुक्रवारी येथील आमराईसमोरील स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस चौकी पाडली. ही चौकी पाडण्यासाठी महासभेत ठराव करण्यात आला होता.
आमराईनजीकच्या जेठाभाई वाडीसमोर स्वातंत्र्यपूर्व काळापासून पोलीस चौकी उभारली होती. या चौकीमुळे पटेल चौक ते कॉलेज कॉर्नर या रस्त्यावरील घडामोडींवर पोलिसांचा वॉच राहात होता. चार महिन्यांपूर्वी ही पोलीस चौकी पाडण्यात यावी, असा ठराव महासभेत करण्यात आला. त्यात परिसरातील काही नागरिकांनीही, रस्त्यास अडथळा होत असल्याचे कारण पुढे करीत चौकी पाडण्याची मागणी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे केली होती.
शुक्रवारी सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथकाने पोलीस चौकीवर हातोडा टाकला. जेसीबीच्या सहाय्याने चौकीची इमारत पाडण्यात आली. पोलिसांना छत्रपती शिवाजी क्रीडांगणातील गाळा देण्यात आला आहे. पण या गाळ्यात सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे अजूनही पोलीस या गाळ्यात जात नाहीत. यावेळी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, नगरसेवक शेखर माने उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस चौकी पाडण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तत्परता दाखविली. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, शहरातील सर्वच अतिक्रमणे काढली जाणार आहेत. आजपासून अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांचे निवेदन आले होते, असे स्पष्टीकरण दिले. (प्रतिनिधी)

कारवाईचे गौडबंगाल काय?
वास्तविक आमराई चौकीबाबतच्या निवेदनापूर्वी नागरिकांनी शहरातील अनेक अतिक्रमणांबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्यावर आजअखेर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. शिवाय पथकाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. आमराई चौकी पाडण्यात मात्र पालिकेने स्वारस्य दाखविले, याचे गौडबंगाल काय? अशी चर्चा आहे.

Web Title: Sangli: Aamrai police chowki nabbed municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.