सांगली: मांजराचा पाठलाग करत थेट घरात घुसला बिबट्या; मरळनाथपूर, रेठरे धरण परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:36 IST2022-10-12T14:35:58+5:302022-10-12T14:36:19+5:30
हजारे यांनी धाडसाने बिबट्या असलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली.

सांगली: मांजराचा पाठलाग करत थेट घरात घुसला बिबट्या; मरळनाथपूर, रेठरे धरण परिसरात भीतीचे वातावरण
रेठरे धरण : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे गावच्या पश्चिमेस वस्तीवर असलेल्या बाळू हजारे यांच्या घरात मांजराचा पाठलाग घरत बिबट्या घुसला. याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक पिंजऱ्यासह वस्तीवर धावले. मात्र, बिबट्या कमी वयाचा असल्याचे लक्षात आल्याने आजूबाजूला मादी बिबट्या असल्याची शक्यता गृहित धरुन या बिबट्यास पकडून मरळनाथपूर डोंगराच्या बाजूला पिटाळून लावण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली.
मरळनाथपूरच्या पश्चिमेस डोंगराच्या पायथ्याजवळ बाळू हजारे यांची वस्ती आहे. रात्री साडेआठच्या सुमारास हजारे कुटुंबीय घरी जेवण करीत असताना एका मांजराचा पाठलाग करीत बिबट्या थेट त्यांच्या घरात घुसला. बिबट्याला पाहून सर्वजण जेवण सोडून बाहेर पळाले. हजारे यांनी धाडसाने बिबट्या असलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली.
तत्काळ ग्रामस्थांना तसेच वनविभागास माहिती दिली. यामुळे हजारे यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली. वनविभागाचे पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी जमावास पांगविले. बिबट्या एका खोलीत बंद असल्यामुळे तत्काळ पिंजरा मागवून बिबट्यास पिंजऱ्यात घेण्यात आले. पकडलेला बिबट्या कमी वयाचा असल्याचे लक्षात आल्यानंतर आसपास मादी बिबट्या असण्याची शक्यता गृहीत धरून ती आक्रमक होऊ नये, यासाठी वस्तीपासून काही अंतरावर मरळनाथपूर डोंगराच्या बाजूला बिबट्याची मुक्तता करण्यात आली. या घटनेने मरळनाथपूर व रेठरे धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.