सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कासेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सदस्या संगीता संभाजीराव पाटील यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी कुंडलचे काँग्रेसचे सदस्य ऋषिकेश महेंद्र लाड विजयी झाले. बुधवारी जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीने बाजी मारत विजयाची गुढी उभारली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत ‘लोकमत’ची बातमी तंतोतंत खरी ठरली.पीठासन अधिकारी तथा मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते. भाजपकडून अध्यक्षपदासाठी स्वप्नाली मासाळ आणि शिंदेसेनेकडून डॉ. शीतल बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे जयराज पाटील आणि शिंदेसेनेचे हिंमत जाधव यांनी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या संगीता पाटील व प्रतिमा मोरे यांनी अर्ज दाखल केले; तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड आणि विद्या कुंभार यांचे अर्ज दाखल झाले. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. त्यानंतर बाबर, मोरे, कुंभार, जयराज पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे संगीता पाटील विरुद्ध स्वप्नाली मासाळ आणि ऋषीकेश लाड विरुद्ध हिंमत जाधव यांच्यात लढती झाल्या.हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेत संगीता पाटील यांना ३४, तर स्वप्नाली मासाळ यांना २५ मते मिळाली. संगीता पाटील यांना नऊ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. उपाध्यक्ष पदासाठी लाड यांना ३४, तर जाधव यांना २५ मते मिळाली. त्यामध्येही लाड यांना नऊ मतांनी विजयी जाहीर करण्यात आले.शिंदेसेनेत फूट; दोन सदस्य गैरहजरमतदानासाठी शिंदेसेनेचे खरसुंडीचे सदस्य व गटनेते जयदीप मोहनराव भोसले आणि दिघंची गटातील पृथ्वीराज तानाजीराव पाटील गैरहजर राहिले. त्यामुळे पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. पक्षाच्या सातपैकी पाच सदस्यांनी भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्याचे स्पष्ट झाले. सहा सदस्यांपैकी दोघांनी भाजप युतीच्या उमेदवारांना उघड मतदान केले. माजी खासदार संजय पाटील गटाचे मणेराजुरीचे शशिकांत जमदाडे आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे समर्थक करगणीचे विनायक मासाळ हे फुटले. पक्षाच्या उर्वरित चौघांनी महाविकास आघाडीच्या बाजूने हात उंचावले.
जिल्हा परिषदेच्या योजना तळागाळात पोहोचविणारकाँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेच्या नेत्यांनी मला संधी दिली. मिळालेल्या या संधीचा चांगला वापर करीन. सर्व सदस्यांना सोबत घेऊन कामकाज करू. जिल्हा परिषदेच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून आदर्श कामकाज केले जाईल.- संगीता पाटील, नूतन अध्यक्षा
सर्वांना विश्वासात घेऊन कामकाजसर्वांच्या सहकार्यामुळे या पदापर्यंत पोहोचता आले. सभागृहातील सर्व सदस्यांना योग्य न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करू. - ऋषिकेश लाड, नूतन उपाध्यक्ष.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो, त्याचा फायदा झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करू. सर्व तालुक्यांतील लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवू. दिवंगत बहीण भारतीताई यांच्या मुलाला जिल्हा परिषदेत सदस्य करून आता उपाध्यक्षही केले. हा आनंदाचा क्षण आहे.- आमदार डॉ. विश्वजित कदम, काँग्रेस नेतेभाजपने सत्तेचा पूर्ण दुरूपयोग करून सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. भाजपचे दोन आमदार, माजी खासदार निवडीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात गॅलरीमध्ये येऊन बसले. दबाव टाकूनही आमचे सदस्य निवडून आले. राजारामबापू पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. - विशाल पाटील, खासदार आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. अनेक गैरप्रकार केले गेले; पण आम्ही आजवर अशा अनेक दबावांना झुगारून लावले आहे. समाजाला विकृत वळण लावण्याचे काम भाजप राजकारणातून करत आहे. त्याच्या बदलाची सुरुवात सांगलीतून झाली आहे. - अजितराव घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
Web Summary : Sangeeta Patil is the new President and Rishikesh Lad the Vice-President of Sangli Zilla Parishad. The Maha Vikas Aghadi secured victory in the election. Patil secured 34 votes, defeating Swapnali Masal, while Lad also won with 34 votes against Himmat Jadhav. Factionalism was evident within the Shinde Sena and NCP.
Web Summary : संगीता पाटिल सांगली जिला परिषद की नई अध्यक्ष और ऋषिकेश लाड उपाध्यक्ष बने। महा विकास अघाड़ी ने चुनाव में जीत हासिल की। पाटिल ने 34 वोट हासिल किए, स्वप्नाली मासाल को हराया, जबकि लाड ने भी हिंमत जाधव के खिलाफ 34 वोटों से जीत हासिल की। शिंदे सेना और एनसीपी के भीतर गुटबाजी स्पष्ट थी।