आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, ५० हजारांहून अधिक जणांना लाभ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:09 IST2025-10-13T17:08:39+5:302025-10-13T17:09:30+5:30
१७ दिवसांच्या आंदोलनाचे फलित

संग्रहित छाया
सांगली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली असून, राज्यभरातील ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात १७ दिवस आंदोलन केले होते. राज्यभरातील जिल्हा परिषद कार्यालयांसमोदर धरणे धरले होते. त्यांच्या अनेक मागण्यांपैकी मानधन वाढीची मागणी अंशत: मान्य करण्यात आली आहे.
१० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, कर्मचाऱ्यांना कामगार आरोग्य विमा योजनेंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटकाळात आर्थिक सहाय्य देण्यासाठी कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यांसह इतर मागण्यांबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्या पुढील कार्यवाहीसाठी विचार सुरू असल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.
वाढीव मानधन कधीपासून लागू होणार? ते पूर्वलक्षी प्रभावाने दिले जाणार का? आंदोलन काळातील मानधन कपात केेले जाणार का? पूर्वलक्षी प्रभावाने दिल्यास सेवानिवृत्तांना वाढीव मानधनाचा लाभ होणार का? याबाबत मात्र शासनाने खुलासा केलेला नाही.
रिक्त जागांवर नियुक्ती द्या
आरोग्य विभागात गेल्या १० वर्षांत अनेक नियमित जागा रिक्त झाल्या आहेत. तेथील कर्मचारी निवृत्त झाले, तरी शासनाने त्यावर नव्याने भरती केलेली नाही. त्या जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, ही कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे.