विद्यापीठ उपकेंद्रासाठी राज्यपालांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:05+5:302021-07-07T04:33:05+5:30
विटा : शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूर हे राष्ट्रीय महामार्गावरील सर्वसोयीनींयुक्त असे ठिकाण आहे. त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे झाले ...

विद्यापीठ उपकेंद्रासाठी राज्यपालांना साकडे
विटा : शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूर हे राष्ट्रीय महामार्गावरील सर्वसोयीनींयुक्त असे ठिकाण आहे. त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे झाले पाहिजे. त्या ठिकाणच्या मंजुरीसाठी राज्य शासनाला सूचना करावी, अशी मागणी भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. आ. पडळकर यांनी या मागणीचे पत्र राज्यपालांना दिले.
आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे होण्याच्या दृष्टीने सन २०१३-१४ पासून प्रक्रिया सुरू आहे. या विषयात सिनेट, मॅनेजमेंट, कौन्सिलची शिफारस होऊन दि. २२ मे २०१४ रोजी या समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
त्यावेळी खानापूर येथील गट नं. ५७२/१ मधील ४२.५६ हेक्टर आर सरकारी जागा उपकेंद्र प्रयोजनासाठी द्यावी, अशी शिफारस केली होती. हा विषय खानापूरसाठी निश्चित झाल्यानंतर आता नव्याने हे उपकेंद्र बस्तवडे (ता. तासगाव) या ठिकाणी मंजूर केल्याची चर्चा सुरू आहे. वास्तविक खानापूर हे ठिकाण प्राकृतिकदृष्ट्या अतिशय सोयीचे असून ही जागा ही राष्ट्रीय महामार्गावर आहे. या जागेशेजारीच खानापूर येथील बारमाही पाण्याचा तलाव असून हे ठिकाण मध्यवर्ती कार्यक्षेत्रातील सर्वच गावांना व विद्यार्थ्यांना सोयीचे आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच मंजूर करण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करावी, अशी मागणी आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली.
फोटो - ०५०७२०२१-विटा-राज्यपाल निवेदन : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करण्याबाबतचे पत्र आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले.